आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोपर्डी: खटल्यातील खटल्यातील सर्व युक्तिवाद पूर्ण; 29 नोव्हेंबरकडे अवघ्या राज्यभराचे लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- बहुचर्चित कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यातील खटल्यातील सर्व युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला. तिन्ही दोषींना २९ नोव्हेंबरला शिक्षा सुनावली जाणार आहे. हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ नाही, असा युक्तिवाद दोषी संतोष भवाळचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी केला. दुसरीकडे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तरीही आरोपींच्या वकिलांनी त्यांचे अशील निर्दोष असल्याचे म्हणणे, हा कोर्टाचा अवमान आहे, हा मुद्दा मांडला. 


अॅड. निकम युक्तिवादात म्हणाले, आरोपींनी विकृतपणे बलात्कार करून त्या क्राैर्याचा आनंदही घेतला. त्यामुळे अशा घटनांमध्ये फाशी देताना गुन्हा व गुन्हेगार हे समान असतात. कोणताही गुन्हा शिक्षेपासून वंचित राहता कामा नये. एखाद्या गोष्टीसाठी रस्त्यावर उतरणे, हा समाजाचा अधिकार आहे. त्यामुळे समाज एखाद्या गोष्टीसाठी एकत्र येत असेल, विशेषकरून न्यायासाठी एकत्र येत असेल, तर त्यात काहीही गैर नाही.


अारोपींकडून युक्तिवाद : हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ नाही
निकमांचा युक्तिवाद : दोषींना निर्दोष म्हणणे कोर्टाचा अवमान 


अॅड. निकम म्हणाले...
अॅड. निकम म्हणाले, बचाव पक्ष एकही सबळ पुरावा सादर देऊ शकला नाही. त्यांचा साक्षीदार आरोपींचे निर्दोषत्व सिद्ध करू शकले नाही. सरकार पक्षाचे साक्षीपुरावे ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींना दोषी ठरवले आहे. तरीही आरोपींच्या वकिलांनी त्यांचे अशील निर्दोष असल्याचे म्हणणे, हा न्यायालयाचा अवमान आहे. सरकार पक्षाने जाणूनबुजून पुरावा तयार केला, असे म्हणणेही अपेक्षित नाही.


विकृततेचे लक्षण
पीडिता व मैत्रीणीची दुर्दशा पाहून आरोपी विकट हसले. हे विकृत मनोवृत्तीचे द्योतक आहे. या घटनेचा तिन्ही आरोपी हसून आनंद लुटत होते. लोक येतील या भीतीने तिघांनी ‘नंतर आपले कामच दाखवू’ असे धमकावत तेथून सटकले. याचाच अर्थ हिच्यावर नंतर बलात्कार करू, असा आहे. १३ जुलैला पीडिता बाहेर आली असता आरोपी रस्त्यावर चकरा मारून तिची वाट पहात होते.


आरोपींना पाहिले
पीडिता घरी येईना म्हणून तिची आई, बहिण, भाऊ शोधायला गेले असता त्यांनी तिची सायकल व कपडे पाहिले. जिथे ती विवस्त्रावस्थेत पडलेली होती, तेथे मुख्य आरोपी उभा होता. फिर्यादी व इतरांना पाहून तो पळाला. दोन आरोपींनी त्याची मोटारसायकल निर्जनस्थळी लपवली होती. एकीकडे तिचे कपडे, दुसरीकडे प्रेत, त्यावरील गंभीर जखमा पाहता हा प्रकार एकटा व्यक्ती करूच शकत नाही, हे स्पष्ट झाले.


आरोपी संतोष भवाळच्या वकिलांचा युक्तिवाद
आरोपी संतोष भवाळ याला कमीत कमी शिक्षा द्यावी, यासाठी अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, की कोपर्डीतील घटना दुर्दैवी आहे. पण प्रत्येकाला बचावाचा हक्क आहे. पण या खटल्यावर स्थानिक वकिलांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे आराेपींसाठी विधी सेवा प्राधिकरणातर्फे वकील नियुक्त करावे लागले. भवाळने जो गुन्हा केला नाही, तो सिद्ध करण्यासाठी सादर केलेले पुरावे दिशाभूल करणारे आहेत. सरकारी वकिलांनी वारंवार नमूद केले असले, तरी हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ नाही. निकाल देताना न्यायव्यवस्था रक्तपिपासू नसावी. आरोपी परिसरात चकरा मारताना दिसला, म्हणजे त्याने बलात्कार व खून केलाच असे नाही. सरकारी साक्षीपुराव्यांवरुन सहआरोपींची भूमिका सारखीच असल्याचे स्पष्ट आहे. दोघांनाही फाशी  देण्याइतपत सबळ पुरावे नाहीत, त्यामुळे कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी खोपडेंनी केली.

बातम्या आणखी आहेत...