आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी प्रकरण: आरोपी पक्षाचा साक्षीदार 17 ऑगस्‍टला तपासणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हासत्र न्यायालयात सुरू असलेली कोपर्डी (ता. कर्जत) खटल्याची सुनावणी १७ ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडली आहे. दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी संतोष भवाळ याच्या वतीने एक साक्षीदार तपासण्याची परवानगी औरंगाबाद खंडपीठाने दिली आहे. खंडपीठाच्या आदेशानुसार या साक्षीदाराच्या नावाने जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी समन्स काढले. ही साक्ष १७ ऑगस्टला नोंदवली जाणार आहे. उलटतपासणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम घेतील.
 
जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर कोपर्डी खटला सुरू आहे. या खटल्यात सरकार पक्षाचे सर्व साक्षीपुरावे तपासून झाले आहेत. तिन्ही आरोपींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी भवाळ याच्या वतीने बचाव पक्षाला रवींद्र चव्हाण, अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. राजेंद्र थोरात (स्टेट ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स), डॉ. उदय निरगुडकर (संपादक), नाशिकच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे संचालक जिल्हाधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून तपासायचे होते. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती.
 
आरोपी भवाळ याच्या वतीने अॅड. बाळासाहेब खोपडे विजयालक्ष्मी खोपडे यांनी औरंगाबाद खंडपीठात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला. त्यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे एेकून घेतल्यानंतर खंडपीठाने एकमेव रवींद्र चव्हाण यांनाच साक्षीदार म्हणून तपासण्याची परवानगी आरोपीच्या वकिलांना दिली. इतर साक्षीदारांना तपासण्याची विनंती खंडपीठाने फेटाळून लावली. खंडपीठाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी आरोपींच्या वकिलांना काही दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत आरोपीचे वकील सर्वोच्च न्यायालयात अपील करु शकतात.
 
दरम्यान, बचाव पक्षाचे पहिले साक्षीदार म्हणून रवींद्र चव्हाण यांना १७ ऑगस्टला न्यायालयात उपस्थित राहण्याचे समन्स शुक्रवारी निघाले. चव्हाण यांनी कोपर्डीतील घटनेच्या बातम्यांवर आधारित सीडी तयार करण्याचे काम केले होते. खंडपीठाच्या आदेशानुसार त्यांनाच बचाव पक्षातर्फे एकमेव साक्षीदार म्हणून तपासण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे त्यांची साक्ष १७ ऑगस्टला नोंदवली जाणार आहे. त्यानंतर विशेष सरकारी वकील निकम त्यांची उलटतपासणी घेतील. दरम्यान, कोपर्डी खटल्याचा निकाल लवकरात लवकर लावावा, अशी मागणी राज्यातील विविध संघटनांनी लावून धरली असून त्यासाठी आंदोलनेही झाली आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...