आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीचे वकील गैरहजर राहिल्याने न्यायालय संतप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोपर्डी खटल्यातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी संतोष भवाळ याचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे शनिवारी सुनावणीला अनुपस्थित होते. त्यांच्या वतीने तसा अर्जही सादर झाला, पण त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीव्र आक्षेप घेतला. न्यायालयानेही संतप्त भावना व्यक्त केल्या. विधी सेवा प्राधिकरणतर्फे अॅड. योहान मकासरे यांनीच आरोपी दोनच्या वतीने उलटतपासणी घ्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला. मात्र, मकासरे यांनी असमर्थता व्यक्त केली. तिसऱ्या आरोपीतर्फे अॅड. प्रकाश आहेर यांनीही मोजकेच प्रश्न विचारले. त्यामुळे पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांची उलटपासणी अपूर्णच राहिली. 
कोपर्डी खटल्याचे कामकाज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. निकम हे काम पहात आहेत. शनिवारी सकाळी साडेअकराला कामकाज सुरू झाले. त्यावेळी आरोपी दोनच्या वतीने काम पाहणारे अॅड. खोपडे न्यायालयात अनुपस्थित होते. तसा अर्ज अारोपीच्या वतीने न्यायालयात सादर झाला. उलटतपासणी घेण्यापूर्वी घटनास्थळ पहायचे आहे, मात्र पोलिस अधीक्षक रजेवर असल्यामुळे आपल्याला संरक्षण मिळू शकले नाही. घटनास्थळ पाहिल्याशिवाय उलटतपासणी घेऊ शकत नाही, असे त्यांनी अर्जात म्हटले होते. 

या अर्जावर अॅड. निकम यांनी तीव्र आक्षेप घेतला. अॅड. खोपडे यांनी यापूर्वीही वेगवेगळी कारणे देत वारंवार सुनावणी तहकूब करायला लावली आहे. न्यायालयाने त्यांना घटनास्थळ पाहण्याची सूचना केलेली नाही किंवा तसे आदेशही दिलेले नाही. यापूर्वीही गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांना दंड केला. तो भरण्यासही त्यांनी नकार दिला होता. सीआरपीसी कलम ३०८ नुसार खटल्याचे कामकाज नियमित चालणे अपेक्षित असताना अॅड. खोपडे हेतूपुरस्पर ही सुनावणी लांबवत आहेत. त्यांनी घटनास्थळ यापूर्वीच का पाहिले नाही, असा मुद्दा अॅड. निकम यांनी उपस्थित केला. न्यायालयानेही या अर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 

त्यानंतर विधी सेवा प्राधिकरणला पत्र लिहून आरोपी दोनतर्फे अॅड. मकासरे यांनीच गवारे यांची उलटतपासणी घ्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले. अॅड. मकासरे यांनी नकार दिला. मात्र, न्यायालयाचे आदेश असल्यामुळे अखेर ते उलटतपासणी घेण्यास उभे राहिले. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे असलेल्या स्टेशन डायरीची मागणी त्यांनी केली. पोलिस निरीक्षक गवारे यांनी मात्र अशी डायरीच नसल्याचा खुलासा केला. ही डायरी उपलब्ध झाल्याशिवाय उलटतपासणी घेऊ शकत नाही, असे मकासरे यांनी नमूद केले. नंतर न्यायालयाने तिसऱ्या क्रमांकाच्या आरोपीच्या वतीने उलटतपासणी घेण्याची सूचना केली. 

तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे याच्यातर्फे अॅड. प्रकाश आहेर यांनी पोलिस निरीक्षक गवारे यांची उलटतपासणी सुरू केली. त्यांनी तिसऱ्या क्रमांकाच्या आरोपीच्या अटकेच्या कारवाईबद्दल, स्टेशन डायरीतील नोंदीबद्दल काही प्रश्न विचारले. नंतरचे प्रश्न नोडल अधिकाऱ्यांच्या उलटतपासणीनंतर विचारु, असे सांगितले. त्यामुळे पीआय गवारे यांची उलटतपासणी शनिवारीही अपूर्णच राहिली. आता या खटल्याची पुढील सुनावणी २२ २३ मेला होणार आहे. 

अॅड. खोपडेंची संधी हुकली 
अॅड.खोपडे अनुपस्थित असल्यामुळे अॅड. मकासरे यांची नियुक्ती करत त्यांनाच आरोपी दोनतर्फे उलटतपासणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यांनी असमर्थता दर्शवल्यानंतर न्यायालयाने आरोपी संतोष भवाळला “तपासी अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का’ अशी विचारणा केली. त्याने नकार दिल्यानंतर न्यायालयाने थेट तिसऱ्या आरोपीतर्फे उलटतपासणी घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता अॅड. खोपडे यांना गवारे यांची उलटतपासणी घेता येणार नाही. 

पत्रकारांना परवानगी 
शनिवारी काही पत्रकारांनी कामकाजाच्या वेळी न्यायालयात बसू देण्यासाठी विनंती अर्ज केला. सरकार पक्षातर्फे अॅड. उज्ज्वल निकम, आरोपींतर्फे कामकाज पाहणारे अॅड. योहान मकासरे प्रकाश आहेर यांनी त्यावर लेखी म्हणणे सादर केले. या पत्रकारांना न्यायालयात बसण्यास हरकत नसल्याचे त्यांनी नमूद केेले. त्यानंतर अर्ज करणाऱ्या पत्रकारांना काही अटी शर्तींवर न्यायालयाने कामकाजाच्या वेळी बसण्यास अनुमती दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...