आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ससाणेंच्या माघारीवर जगतापांचे भवितव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नागपूर येथे अधिकृत जागावाटप जाहीर केले असताना नगरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पेच उभा राहिला आहे. ससाणे यांच्या माघारीवरच राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अरुण जगताप यांचे भवितव्य ठरणार आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी दाखल झालेल्या दहा उमेदवारी अर्जापैकी आठजणांचे अर्ज गुरूवारी वैध ठरवण्यात आले. शिवसेनेचे उमेदवार शशिकांत गाडे यांनी दाखल केलेला पहिला उमेदवारी अर्ज स्वाक्षऱ्या नसल्यामुळे बाद ठरवण्यात आला, तर अपक्ष उमेदवार हेमंत ढगे यांचा अर्ज सूचक नसल्याने बाद झाला. शनिवारी (१२ डिसेंबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने या दिवशीच लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

राष्ट्रवादीचे उमेद्वार अरुण जगताप, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्यात सध्या तिरंगी लढत दिसत असली, तरी ससाणे अखेरच्या दिवशी उमेदवारी मागे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ससाणे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना विचारुनच उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे.

या निवडणुकीसाठी एकूण जणांनी १४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी सकाळी अकरा वाजता पोलिस बंदोबस्तात जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे, निवडणूक अायोगाचे निवडणूक निरीक्षक आर. डी. देवकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर तहसीलदार राजेश थोटे यांच्यासह उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जांची छाननी झाली. राष्ट्रवादीचे जगताप, शिवसेनेचे गाडे, ससाणे, दत्तात्रेय पानसरे, भरतकुमार नाहटा, मच्छिंद्र सुपेकर, सोमनाथ तनपुरे संजय फंड यांचे अर्ज वैध ठरले. सूचक नसल्यामुळे हेमंत ढगे यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे शशिकांत गाडे यांचा पहिला अपक्ष अर्ज स्वाक्षऱ्या नसल्याने बाद ठरवण्यात आला. शनिवार (१२ डिसेंबर) उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस असून, या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. शनिवारपासून खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग चढेल. शिवसेना राष्ट्रवादीकडून दोन दिवसांपासून प्रचार सुरु झाला आहे.
अर्जांची छाननी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली. छाया - सिद्धार्थ दीक्षित

स्वीकृत सदस्यांना मतदानाचा हक्क
यानिवडणुकीत सर्वाधिक मतदार हे जिल्हा परिषद सदस्य नगर महापालिकेचे सदस्य आहेत. जिल्हा परिषदचे स्वीकृत वगळता ७५ सदस्य आहेत, तर नगर महापालिकेचे स्वीकृत वगळता ६६ सदस्य आहेत. ३८ स्वीकृत सदस्य आहेत. बुधवारी रात्री उशिरा स्वीकृत सदस्यांना मतदानाबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय झाला असून, स्वीकृत सदस्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

आघाडीची आज मुंबईत बैठक
काँग्रेसच्या उमेदवाराविरुध्द राष्ट्रवादीने, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने अपक्ष म्हणून उमेदवार उभे केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. नगरच्या एका जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरुध्द काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पेच वाढला आहे. याबाबत शुक्रवारी मुंबईत बैठक होणार असून, यावेळी तोडगा निघणार असल्याचे समजते.

निवडणूक निरीक्षक नियुक्त
निवडणुकीच्याकामकाजावरलक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आर. डी. देवकर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा विशेष समाज कल्याण अधिकारी माधव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.'' अरुण आनंदकर, उपजिल्हानिवडणूक अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...