आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या हल्ल्यात गंगापूर तालुक्यातील चार वर्षीय मुलीचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- संगमनेरनजीक धांदरफळ खुर्द गावात गुरुवारी पहाटेच्यावेळी नरभक्षक बिबट्याने एका चार वर्षीय चिमुरडीला झोपेतून उचलून नेत तिच्यावर हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाला. रेखा लक्ष्मण जाधव असे मृत मुलीचे नाव आहे.

धांदरफळ खुर्द-मिर्झापूर रस्त्यालगत ठाकर समाजाची वस्ती आहे. मुळचे चिंचखेडा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील व सध्या बोटा (ता. संगमनेर) येथे वास्तव्यास असलेले लक्ष्मण जाधव हे आपली पत्नी व दोन मुलांसह या वस्तीवरील नातेवाईकांकडे आले होते.

बुधवारी रात्री हे कुटुंबीय ओट्यावर झोपले होते. रेखा आपल्या आई- वडिलांजवळ झाेपली हाेती. मात्र पहाटेच्या सुमारास या वस्तीत आलेल्या बिबट्याने रेखाला उचलून फरफटत शेजारच्या शेतात नेले, मात्र सर्व जण झोपेत असल्याने कोणालाही त्याचा पत्ता लागला नाही. लगतच्या झोपड्यांतील लोकांनी बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला. त्यांच्या आरडाओरडीमुळे जागे झालेल्या जाधव दांपत्याला रेखा कुठेच दिसली नाही. त्यामुळे त्यांनीही बिबट्याच्या भीतीने आरडाओरड सुरू केली. दरम्यान, बिबट्याने चिमुरडीला शेजारच्या शेतात नेत हल्ला चढवला. प्रतिकार कमी पडल्याने काही वेळातच रेखा बिबट्याचे भक्ष्य बनली. बिबट्या मुलीवर हल्ला करताना दिसत असूनही लोक काहीही करू शकले नाहीत. दीड तासाहून अधिक वेळ बिबट्याने तेथे तळ ठोकला होता. सकाळीच काही ग्रामस्थांसह पोलिस, वनविभागाचे कर्मचारी, नातेवाईकांनी शेतात तेथे पडलेल्या रक्ताच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना उसाच्या शेतात मृतदेह सापडला.