आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेकडून "भोसले' नावाचे गूढ, शशिकांत गाडे डमी उमेदवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अवघे काही तास शिल्लक असताना शिवसेनेने धक्कातंत्राचे प्रयोग सुरू केले आहेत. शिवसेनेकडून यापूर्वी अर्ज दाखल केलेले पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे हे डमी उमेदवार असल्याचे मंगळवारी सायंकाळी समोर आले असून बांधकाम व्यावसायिक भोसले यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षाकडून खल सुरू होता.
बुधवारी (९ डिसेंबर) दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून शेवटच्या क्षणी शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज दाखल होईल, अशी माहिती शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. युतीच्या या खेळीने उत्कंठा वाढली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून जिल्ह्यातील एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार अरुण जगताप यांनी डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला. मित्रपक्ष काँग्रेस ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख वगळता राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील झाडून सर्व नेते यावेळी जगताप यांच्यासमवेत होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विजयाची औपचारिकता बाकी असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख गाडे यांनीही त्याच दिवशी अर्ज दाखल केला. मात्र, हा अर्ज अर्धवट भरला होता. मंगळवारी पुन्हा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गाडे यांनी पहिल्या उमेदवारी अर्जाबरोबर प्रतिज्ञापत्र दिले नव्हते.
शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्याशी गाडे यांचे सूर जुळले आहेत. मात्र, शिवसेना भाजपकडे असलेले मतदारांचे संख्याबळ लक्षात घेता निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा नाही, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तियांकडून देण्यात आली. वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या आदेशानुसार त्यांनी केवळ डमी अर्ज भरल्याचे मंगळवारी सायंकाळी समोर आले. बांधकाम व्यावसायिक भोसले यांच्या नावाची चर्चा शिवसेनेच्या आतल्या गोटातून मंगळवारी सायंकाळी बाहेर आली. पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी नेत्यांनी या चर्चेला पुष्टी दिली असली, तरी बुधवारी शेवटच्या क्षणीच उमेदवाराचे नाव समोर येईल.

राष्ट्रवादीच्या आत्मविश्वासाला छेद देण्याची व्यूहरचना शिवसेनेकडून आखण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या प्रबळ उमेदवार देऊन लढाईतील रंगत वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. विधान परिषदेत युती अल्पमतात असल्याने संख्याबळ वाढवण्यासाठी सत्ताधारी युती ही निवडणूक गांभीर्याने घेणार असून परस्परांना पूरक भूमिका घेण्यात येणार असल्याचे युतीचे स्थानिक नेते सांगत आहेत. एकूणच शिवसेनेच्या धक्कातंत्राने आघाडीची धाकधूक वाढवली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे शशिकांत गाडे यांनी बुधवारी सकाळी दुसरा उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासमवेत भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे आदी होते.
शिवसेनेचे काम करणार
शिवसेना-भारतीयजनतापक्षामध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. नगरची जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. त्यांनी कुठला उमेदवार द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यात भाजप हस्तक्षेप करणार नाही. युती म्हणून भाजप शिवसेनेचे काम करणार आहे.'' राम शिंदे, पालकमंत्री.
नगसेवकांनी मागितले पैसे !
बुधवारीअपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले हेमंत ढगे यांनी सूचक अनुमोदक होण्यासाठी दहा नगरसेवकांनी पैसे मागितल्याचे अर्जात नमूद केले आहे. सूचक अनुमोदकाच्या रकान्यात त्यांनी तशी माहिती भरून अर्ज दाखल केला आहे. तशी तक्रारही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आजचा दिवस ठरणार निर्णायक
विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात युती-आघाडी झाली असून, नगरमध्ये मुख्य लढत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी आहे. आतापर्यंत पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने हा दिवस निर्णायक ठरणार आहे.
राष्ट्रवादीकडून अरुण जगताप, सेनेकडून जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे अपक्ष म्हणून संजय फंड यांनी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत ३२ जणांनी ५२ अर्ज नेले आहेत. मंगळवारी जगन्नाथ वैरागर यांनी अर्ज नेला. हेमंत ढगे (अपक्ष) मच्छिंद्र सुपेकर (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज नेणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरी भरणाऱ्यांची संख्या मात्र पाच आहे.
शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. गाडे यांनी मंगळवारी दुसऱ्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार राजेंद्र थोटे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना सूचक म्हणून पूनम भिंगारदिवे, उषा कराळे, दत्तात्रेय सदाफुले, अनिल शिंदे, छाया तिवारी, सचिन जाधव, सागर बोरुडे, संजय शेंडगे, सुरेखा कदम विजय भांगरे हे आहेत.
बातम्या आणखी आहेत...