आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळशेज रेल्वेमार्गाचे तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण, तीन जिल्ह्यांच्या विकासाला मदत होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओतूर - नगर,पुणे ठाणे या तीन जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरू शकणाऱ्या तब्बल २२ वर्षांपेक्षा अधिक वर्षे रखडलेल्या नगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वे मार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण मे महिन्यात पूर्ण झाले अाहे. या मार्गावर एकूण २६ रेल्वे स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. हा मार्ग जनतेबरोबरच रेल्वेच्या दृष्टीनेही फायद्यात दाखवण्यात आल्यामुळे दीर्घकाळ रखडलेल्या या रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा मार्ग सुरू झाल्यास नगर ते कल्याण अंतर वेगवान रेल्वेने अवघ्या साडेतीन ते चार तासांत कापणे शक्य होणार आहे. शिवाय हा पर्याय कमी खर्चाचा असणार आहे.
 
नगर पुणे जिल्ह्यातील शेेतमाल मुंबईला अत्यंत कमी वेळेत पोहोचू शकणाऱ्या या रेल्वेमार्गाची अनेक वर्षांपासून मागणी आहे. याविषयी अधिक माहिती देताना माळशेज रेल्वे कृती समिती जुन्नर तालुका अध्यक्ष विजय वायकर यांनी सांगितले, हा मार्ग व्हावा म्हणून आजपर्यंत अनेक वर्षे माळशेज रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून मोठा संघर्ष केला आहे. हा मार्ग नगर, ओतूर, माळशेज घाट, मुरबाड, अंबरनाथ कल्याण असा जाणार आहे. असून या मार्गावर नगर, भाळवणी, धोत्रे, वासुंदे, शिंदेवाडी, कोटडावाडी, मालवाडी, पदरवाडी, ओतूर, जुन्नर रोड, मढ, केबिन, देवरूखवाडी, वारीवघर केबिन, नागतार केबिन, डाहेरी मिल्हे, राव, मुरबाड, पाटगाव, आपटी, कांभा रोड, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी कल्याण अशी रेल्वेस्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. यातील बहुतांशी गावे विकासापासून वंचित आहेत. या मार्गामुळे रेल्वेस्थानके प्रस्तावित असलेल्या गावांचाही वेगाने विकास होणार आहे.
 
सर्वेक्षण करणाऱ्यांनी हा रेल्वे मार्ग पूर्णतः फायद्यात असल्याचे सांगितल्याची माहिती समजली. सध्या या तांत्रिक सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल आला असला, तरी अंतिम अहवाल तयार झाल्यानंतरच तो रेल्वे बोर्डासमोर मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. त्याला मान्यता मिळण्याची आता फक्त औपचारिकता बाकी असल्यामुळे हा मार्ग मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास वायकर यांनी व्यक्त केला.
 
माळशेज रेल्वे सुरू झाल्यानंतर ठाणे, पुणे नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दूरची बाजारपेठ जवळ येणार अाहे. त्यामुळे वाहतूक खर्च वेळ याची बचत होणार आहे. शिवाय माल वाहतुकीचा नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. या पलीकडे नगर - औरंगाबाद मार्गे पुढे विशाखापट्टणम् हा मार्ग देखील जवळ होऊन जोडला जाऊ शकतो. त्यामुळे हा नवा माळशेज रेल्वे मार्ग ठाणे, पुणे नगर या तिन्ही जिल्ह्यंातील शेतकऱ्यांच्या विकासाचे नवीन पर्व घेऊन येणार आहे. नगरच्या रेल्वेस्टेशनचा, तसेच शहराच्या विकासासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

मराठवाड्यालाही लाभ होणार
नगर-कल्याण माळशेजमार्गे रेल्वे मार्ग नगरसह पुणे, ठाणे, तसेच मराठवाड्याच्या विकासालाही पूरक ठरणार आहे. सध्या नगर-बीड-परळी मार्गाचे काम जोरात सुरू आहे. कल्याण रेल्वेमार्गही पूर्ण झाला, तर मराठवाड्यातील जनतेचा मुंबईला जाण्यासाठीचा वेळ पैसा वाचणार आहे.
- हरजितसिंग वधवा, सदस्य,क्षेत्रीय सल्लागार समिती
 
पर्यटनास चालना मिळण्याची चिन्हे
या मार्गावर असणारा माळशेज घाट सध्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण बनले आहे. रेल्वेच्या सोयीमुळे तेथील पर्यटन व्यवसाय अधिक फुलणार आहे. या मार्गाजवळच असलेल्या जुन्नरजवळील शिवनेरी किल्लाही पर्यटकांचे मोठे आकर्षण असल्याने या मार्गामुळे पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळणार अाहे. पर्यटन क्षेत्रात माळशेज घाट जुन्नर तालुक्यात माळशेज रेल्वे क्रांती निर्माण करेल, अशी आशा पर्यटन क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...