आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी दूध संस्थांकडून खरेदी दरात रुपये घट, दुधाची तीन रुपये दरवाढ ठरली फसवी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शेतकऱ्यांच्या संपामुळे नमून राज्य सरकारने दूध दरात तीन रुपये दरवाढ केल्याचा डंका पिटला. मात्र जिल्ह्यातील खासगी दूध संघांनी सरकारला दणका देत आपले खरेदीचे दर तीन रुपयांनी घटवले आहेत. या मागे दूध पावडरचे दर घटण्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे. ते आधी शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रुपयांपेक्षा अधिक दर देत होते. आता त्यांचा दर २४ रुपयांवर आला आहे. दूध संकलनात किमान ७० टक्के वाटा या संस्थांचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
 
याउलट सहकारी दूध संघ मात्र सरकारच्या निर्देशानुसार २७ रुपयांनी दूध खरेदी करत आहेत. गुजरातमधील अमूलसारखा सहकारी दूध संघही २८ रुपयांनी दूध खरेदी करत आहे. त्यामुळे सरकारने केलेल्या दरवाढीचा जिल्ह्यातील दूध उत्पादकांना फारसा लाभ झालेला नाही. ही दरवाढ फसवी ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिवाय कमी दरामुळे भेसळीचे प्रमाणही चिंताजनक आहे. खासगी संस्थांनी एक जुलैपासून आपले दर घटवल्याची माहिती स्वाभिमानी दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. दुधाचे खरेदी दर किमान ३५ रुपये करण्याची मागणी त्यांनी केली.
 
राज्यात नगर जिल्हा दूध उत्पादनात आघाडीवर आहे. किंबहुना जिल्ह्याला लागून असलेल्या मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असताना नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दूध धंद्यानेच तारले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण खूप कमी आहे. पण, गेल्या पाच वर्षांतील चार वर्षांत सातत्याने पडलेल्या दुष्काळाची, तसेच सरकारच्या धरसोड वृत्तीची झळ मोठ्या प्रमाणात दूध धंद्याला बसली. गेल्या वर्षभरात एकट्या नगर जिल्ह्यात दूधसंकलनात दहा लाख लिटरची घट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील रोजचे दूध संकलन २८ वरून १८ लाख लिटरवर आले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील दूध उत्पादक गायींची विक्री केली. त्यामुळे पशूधनाची मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ही घट भरून काढण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. सरकारचे धोरण असेच राहिले, तर मात्र ते अवघड आहे.
सध्या चाऱ्यासाठी उसाचा दर चार हजार रुपये टनांवर गेला आहे. गेल्या वर्षभरात खाद्याचे दर ५० टक्क्यांनी वाढले. दूध धंदा टिकण्यासाठी गायीच्या दुधाचा खरेदी दर किमान ३५ रुपये करण्याची मागणी, अशी डेरे सातत्याने करत आहेत. मात्र, सरकार नेहमीच एक दोन रुपयांची दरवाढ करून वेळ मारून नेत आहे. यावेळी तीन रुपयांची वाढ केली, इतकाच त्यात फरक आहे.
 
या वेळी जी तीन रुपये दरवाढ सरकारने केली, त्यामुळे गायीच्या दुधाचा खरेदी दर २७ रुपये झाला आहे. जिल्ह्यातील सर्व मोठे खासगी दूध संघ म्हणजे श्रीरामपूरचा प्रभात, पाचपुतेंचा कृष्णाई, नगरचा प्रियदर्शिनी, पारस, संगमनेरचाच एस. आर. थोरात दूध, राहुरी तालुक्यातील ब्राह्मणीचा माउली, निघोजचा कन्हैया या खासगी संस्था मुळातच २७ ते २८ रुपये ५० पैसे असा गायीच्या दुधाला प्रतीनुसार दर देत होत्या. यातील बहुसंख्या खासगी संस्थांनी आपल्या खरेदी दरात तीन रुपयांची घट केली आहे. या उलट, अमुल तर सकाळी २८ रुपये सायंकाळी ३० रुपये प्रतिलिटर दर देत आहे.
 
संगमनेरचा राजहंस, कोपरगावात गोदावरी बाभळेश्वर हे जिल्ह्यातील मोठे सहकारी दूध संघ आहेत. तेही सरकारने तीन रुपये वाढवून जाहीर केलेल्या दराच्या जवळ जाणारी किमत म्हणजे २६ रुपये ५० पैसे प्रतिलिटर देत होतेच. कारण त्यांनाही खासगी संघांशी स्पर्धा करावी लागत होती. आता त्यांनी आपला जदर २७ रुपये केला आहे. त्यांचे दुखणे वेगळेच आहे. यांचे सर्व दूध राज्य सहकारी दूध संघ घेत नाही. त्यामुळे उरलेले दूध त्यांना खासगी दूध संघांनाच विकावे लागते. अनेकदा खासगी दूध संघ यांची अडचण पाहून कमी दरात दूध मागतात. आता तर त्यांनी खरेदी दरात मोठी कपात केल्याने सहकारी तालुका दूध संघांची मोठी अडचण झाली आहे. राजहंस गोदावरी दूध संघ प्रक्रिया उद्योगात आहे. त्यामुळे त्यांना तसा वाढीव दर देऊ शकत आहेत. तालुका पातळीवरील दूध संघांची अडचण झाली आहे.
 
शेतकऱ्याला तोटा १० रुपयांचा
अजूनही शेतकरी दूध धंद्याला शेतीला पूरक व्यवसाय समजतात. ते पूर्णवेळ फक्त दूधधंदा करत नाहीत. त्यामुळे या धंद्यातील त्यांच्या मनुष्यबळाच्या श्रमांचे मूल्य गृहित धरत नाहीत. ते खर्चात मिळवल्यावर दुधाचा प्रतिलिटर खर्च ४५ रुपयांवर जातो. अगदी त्यातील त्याच्या श्रमाचे दहा रुपये वजा केले, तरी त्याला किमान ३५ रुपये प्रतिलिटर दर मिळण्याची गरज आहे.
 
मधल्यांचाच फायदा
गायीम्हशींच्या दुधाचा खरेदी दर अनुक्रमे २७ ३६ रुपये आहे. दूधविक्रीचा दर मात्र अनुक्रमे ४४ ६० रुपये आहे. शेतकऱ्यांपेक्षा मधल्या लोकांना जास्त पैसे मिळणे, ही बाबच दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात सरकारला नेहमीच खूप वेळ लागतो, असा अनुभव नेहमीचा झाला आहे.
 
उत्पादकता वाढवणे आवश्यक
शेतकऱ्यांना दूध धंद्यात फायदा मिळण्यासाठी गायींची उत्पादकता वाढवणे आवश्यक असल्याचे मत एका खासगी दूध संघाच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केले. सध्या राज्यातील संकरित गायी सरासरी १२ लिटर दूध देतात. सध्याच्या खर्चात चांगले व्यवस्थापन करून ही उत्पादकता वाढणे शक्य आहे, तसे केले तरच दूध उत्पादकांना हा धंदा परवडणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
दोन वेळस दूध संकलन सक्तीचे हवे
दुष्काळातशेतकऱ्यांनाजगवणाऱ्या दूध धंद्याबाबत राज्य सरकारचे धोरण धरसोडीचे राहिले आहे. त्यामुळे दरवाढीचे बंधन फक्त सहकारी दूधसंस्थांनाच आहे. या धंद्यातील सहकार संपवून खासगी दूध संघांच्या ताब्यात हा धंदा सोपवण्याचा सरकारचा डाव असल्याचे स्पष्ट होत आहे. खासगी दूध संस्थांच्या मनमानीचा अनेकदा फटका बसूनही सरकार शहाणे होत नाही. एकदा सहकार संपला, की जिल्ह्यातील दूध धंदा खासगी संस्थांच्या ताब्यात जाऊन त्यांचे राज्य येण्याची भीती आहे. त्याचा प्रचंड मोठा फटका दूध उत्पादकांना बसणार आहे. दोन वेळेस दूध संकलन सक्तीचे केले तरी हा धंदा फायद्याचा ठरणार आहे.''
- गुलाबरावडेरे, अध्यक्ष, स्वाभिमानी दूध उत्पादक संघटना.
 
खासगी दूध संस्थांना चाप आवश्यक
शासनाने दूधउत्पादक शेतकऱ्यांना तीन रुपयांची दूध दरवाढ दिल्याने आणि दूध विक्री दरात वाढ केलेली नसल्याने सहकारी दूध संस्थांना नुकसानीला सामोर जावे लागत आहे. हे नुकसान कशी भरून काढायचे, हा आमच्यासमोर प्रश्नच आहेच. शासन या संदर्भात आणखी काही भुमिका घेते का, याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. एकीकडे शासनाने सहकारी दूध संघाना दरवाढ देणे बंधनकारक केले असले, तरी काही खासगी दूध संस्थांनी मात्र ही दरवाढ देण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. शासनाने या बाबतीतदेखील निर्णय घेण्याची गरज आहे. शासन निर्णयापूर्वीच आम्ही दूध दरात दोन रुपयांची वाढ दिली होती.''
- रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष, संगमनेर तालुका दूध संघ.
 
राज्य सरकारचे चुकीचे धोरण
एकेकाळीदूध उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र आता सातव्या क्रमांकावर घसरला आहे. केवळ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. या उलट उत्तर प्रदेश, गुजरात कर्नाटक राज्यांत दूध धंदा अधिक वेगाने वाढत अाहे. महाराष्ट्राच्या बाजूच्या सर्व राज्यांत दुधाचा खरेदी दर ३० रुपयांच्या दरम्यान आहे. विशेषत: त्यात भाजपशासित राज्येही आहेत. आपल्याकडे मात्र स्थिती शोचनीय आहे.
 
बातम्या आणखी आहेत...