आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला खटकतेय पालकमंत्री शिंदेंची शिवसेनेशी जवळीक, काँग्रेसमध्ये मात्र सन्नाटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपचे प्रदेश स्तरावर जमत नसताना नगर जिल्ह्यात मात्र पालकमंत्री नगर शहरातील शिवसेना नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ‘मस्त चाललंय आमचं’ सुरू आहे. पालकमंत्र्यांचे शिवसेनेचे चांगले ‘सूत’ जमल्यामुळे शहर भाजपमध्ये मात्र अस्वस्थता पसरली अाहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्यांच्या पालकमंत्र्यांशी भेटी वाढल्याने नेमके काय गौडबंगाल? याची चर्चा सध्या सुरु झाली असून, शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र यावर मौन पाळणेच पसंत केले आहे. 

राज्यात सत्तेवर आल्यापासून शिवसेना भाजपमध्ये ‘जमत’ नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी सत्तेत असतानाही शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागले. त्यानंतर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. नोटाबंदीच्या काळातही शिवसेना नेत्यांनी या विषयावर थेट केंद्र सरकारवर टीका केली होती. दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करावी, या मागणीसाठी शिवसेनेने गेल्या चार दिवसांपूर्वी नगरसह राज्यभरात आंदोलन केले. वास्तविक सरकारने ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या बँकखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे स्पष्ट केले होते. ३० सप्टेंबरला दसरा आहे. सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या बँकखात्यात रक्कम जमा होणार आहे. केवळ एक दिवस उशीर होत असल्यामुळे शिवसेनेला हे आंदोलन करावे लागले. अनेकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीतदेखील शिवसेना-भाजपच्या मंत्र्यांमध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे. 

राज्यात शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली असताना नगर जिल्ह्यात मात्र पालकमंत्री राम शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत चांगलेच सूत जमल्याने चर्चेला उधाण आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते पालकमंत्र्यांच्या भेटीला जात आहेत. स्थानिक संस्थेच्या निधीसाठी हे नेते पालकमंत्र्यांच्या भेटीला जात असले, तरी यातून गांधी गटाला शह देण्याचा पालकमंत्र्यांचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बाेलले जाते. विशेष म्हणजे पालकमंत्री शिंदे गांधी यांचे ही गेल्या काही महिन्यांपासून जमत नसल्याने शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना जवळ केल्याची चर्चा आहे. पालकमंत्र्यांच्या सेनेच्या जवळीकीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांत मात्र नाराजीचा सूर आहे. भविष्यात भाजपचा हा शिवसेना विरोधी पक्ष राहणार आहे. त्यादृष्टिने भाजपच्या प्रदेशस्तरावर हालचालीदेखील सुरू आहेत. चार दिवसांपूर्वीच भाजपने आगामी निवडणुकीसाठी स्वबळासाठी तयारी ठेवण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत. असे असताना पालकमंत्र्यांची शिवसेनेबरोबरची जवळीक भाजप पदाधिकाऱ्यांना चांगलीच खटकत आहे. त्यातच शिवसेना नेत्यांमध्ये ही आता अंतर्गत गटबाजी सुरू झाल्याची चर्चा असून, अनेक जण पालकमंत्र्यांच्या माध्यमातून भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. काही जणांनी खासदार दिलीप गांधी यांच्यामार्फत पक्षात येण्याची तयारी सुरू केली आहे. 

काँग्रेसमध्ये मात्र सन्नाटा 
तीन वर्षांपूर्वी दोन मंत्री असलेल्या नगर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये सत्ता गेल्यापासून मात्र सन्नाटा आहे. पक्ष कार्यालयेदेखील केवळ पुण्यतिथी, जयंत्या साजरी करण्यापुरती उरली आहेत. मध्यंतरी काँग्रेसच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांचे मारामारीचे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात गेल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. ही गटबाजी वाढतच चालली आहे. 
बातम्या आणखी आहेत...