आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

185 जवानांचे दीक्षांत संचलन, एमआयआरसीमधील 403 वी तुकडी होणार विशेष प्रशिक्षणासाठी रवाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरच्या मेकॅनाइज्ड रेजिमेंटल सेंटरमधील (एमआयआरसी) १८५ जवानांनी शनिवारी सकाळी शानदार संचलन करत देशनिष्ठेची शपथ घेतली. एमआयआरसीची ही ४०३ वी तुकडी होती. हे जवान विशेष प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत.
 
मेजर जनरल जे. के. शर्मा यांनी संचलनाची मुख्य सलामी स्वीकारली. जगातील सर्वोत्तम लष्करातील सर्वोत्तम रेजिमेंटमध्ये आपण प्रवेश केला आहे. जवानांनी स्वयंशिस्त पाळून आपले कर्तव्य प्रामाणिकपणा समर्पण भावनेने करण्याचे आवाहन त्यांनी केले. शानदार संचलनाबद्दल त्यांनी जवानांचे, तर आपला सुपुत्र देशसेवेसाठी दिल्याबद्दल त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.
 
संचलनाची मुख्य सलामी स्वीकारल्यानंतर शर्मा यांनी उघड्या जीपमधून संचलनाचे निरीक्षण केले. त्यानंतर हिंदू, शीख, मुस्लिम ख्रिस्ती धर्मगुरूंचे मैदानात आगमन झाले. धर्मग्रंथांवर हात ठेवून जवानांना देशरक्षणाची शपथ घेतली. त्यानंतर देशनिष्ठेची पारंपरिक शपथ घेतल्यावर सर्व जवानांनी बँडपथकासह संचलन करीत सलामी मंचासमोर जाऊन मेजर जनरल शर्मा यांना सलामी दिली. त्यानंतर प्रथम ध्वज तुकडी नंतर जवानांनी मंचासमोर येऊन सॅल्य्ूट करत मैदान सोडले. या शानदार संचलनाबद्दल उपस्थित वरिष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी जवानांच्या कुटुंबीयांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. 

संचलनानंतर जवानांनी एमआयआरसीतील शहीद स्मारकासमोर जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मेजर जनरल शर्मा यांनी पालकांनाही त्यांनी आपला सुपुत्र देशेसेवेसाठी दिल्याबद्दल गौरव पदक प्रदान करून धन्यवाद दिले. त्यानंतर जवानांनी ते पदक स्वत: आपल्या वडिलांच्या छातीवर लावले. या हृद्य सोहळ्यामुळे पालकांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद जवानांनी व्यक्त केला.
 
जनरल सुंदरजी सुवर्णपदक सूरजला 
संचलनात प्रशिक्षणादरम्यान सर्वच क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरीबद्दल मेजर जनरल जी. के. शर्मा यांनी रिक्रूट सूरज सिंह याला जनरल सुंदरजी सुवर्णपदक, अविनाशकुमार याला जनरल सुंदरजी रौप्यपदक, तर राहुल जटराना याला जनरल सुंदरजी कांस्यपदक या समारंभात प्रदान केले. 
बातम्या आणखी आहेत...