आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार कर्डिले यांचा गुन्ह्यातून वगळण्याचा अर्ज फेटाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- फसवणूक,आर्म अॅक्टसह इतर कायदा कलमान्वये नोंदवलेल्या गुन्ह्यातून आपले नाव वगळावे, असा आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलेला अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तेजस्विनी निराळे यांनी महिनाभरापूर्वी हा निर्णय दिला. त्यामुळे या गुन्ह्यात दोषनिश्चिती ठरवण्याच्या पुढील तारखेला संबंधित न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
डॉ. कांकरिया यांची जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करुन २०११ मध्ये त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावण्यात आले होते. याप्रकरणी आमदार कर्डिले, प्रकाश कुंडलिक कर्डिले अनिल प्रकाश कर्डिले यांच्याविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. कॅम्प पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले आहे. दरम्यान, आमदार कर्डिले यांच्या वतीने या गुन्ह्यातून आपले नाव वगळावे, यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.
त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी निराळे यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अॅड. बी. एफ हिरे यांनी बाजू मांडली होती. गुन्ह्यातील तपास पूर्ण झाला असून पोलिसांनी ठोस पुरावे गोळा केले असल्याचे अॅड. हिरे यांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आमदार कर्डिले यांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे दोषनिश्चिती होण्याच्या पुढील तारखेला आमदार कर्डिले यांना संबंधित न्यायालयासमोर हजर रहावे लागणार आहे.