आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: पैशांच्या वादातून युवकाचा खून, भिंगारमधील घटना; दोन्ही आरोपी अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मोटारसायकल विक्री व्यवहारातील पैशांच्या वादातून भिंगारमध्ये बुधवारी रात्री एका युवकाचा खून झाला. शेखर देविदास गायकवाड (वय १९, भिंगार) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास सदर बाजार परिसरात घडला.
 
पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवत दोन मारेकऱ्यांना पकडले. शेखर हा रिक्षाचालकाचा मुलगा आहे. या घटनेमुळे भिंगार परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. 
शुभम रमेश कांबळे रोहित श्याम कांबळे (दोघेही भिंगार) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत भिंगार पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेखरने शुभम रोहित यांच्याकडून काही दिवसांपूर्वी मोटारसायकल घेतली होती. त्यापोटी त्याने त्यांना काही पैसेही दिले होते. मात्र, ही मोटारसायकल त्याला अावडली नाही. त्यामुळे त्याने शुभम रोहितकडे मोटारसायकल परत घेऊन पैसे देण्यासाठी लकडा लावला होता. या कारणावरुनच बुधवारी त्यांच्यात वाद झाले. 

सदर बाजारात समोरासमोर अाल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान नंतर भांडणात झाले. या भांडणातच शुभम रोहित यांनी शेखरला चाकूने भाेकसले, तसेच त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. आरडाओरडा झाल्यानंतर बघ्यांची गर्दी गोळा झाली. काहीजणांनी जखमी शेखरला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता. ही घटना समजल्यामुळे भिंगारच्या युवकांनी जिल्हा रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक तथा शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक चिन्मय पंडित, भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले. या घटनेनंतर सदर बाजार परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पाेलिसांनी या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. 
बातम्या आणखी आहेत...