आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमधून जाणारे सर्व रस्ते होणार राष्ट्रीय महामार्ग, खासदार गांधी यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुख्यमंत्र्यांनी २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून जाहीर केले आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ‘स्वागत अहमदनगर’तर्फे रविवारपासून ‘हेरिटेज वॉक’ या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमाला प्रारंभ झाला. खासदार दिलीप गांधी, उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यासह अनेक इतिहासप्रेमी यावेळी उपस्थित होते. महापालिका भाजपच्या वतीने यावेळी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. नगर शहराला जोडणारे सर्व रस्ते आता राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याने पर्यटनवाढीला मोठी संधी असल्याचे खासदार गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितले. 
 
प्रारंभी अहमद निजामशहाच्या कबरीवर सीए राजेंद्र काळे नगरसेविका मनीषा काळे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. निजामशाहीतील वैभवशाली स्थापत्यरचना, औद्योगिक भरभराट, व्यापार, जलव्यवस्थापन, संरक्षण शिक्षण अशा विविध अंगांबरोबर बागरोजा परिसरातील विविध गोष्टींची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली. 

नगरमधील ३२ एेतिहासिक वास्तूंसाठी १६ कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे. सीएसआर फंडातून हा निधी उपलब्ध होणार आहे, असे सांगून खासदार गांधी म्हणाले, नगर शहरातून जाणाऱ्या सर्व महामार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार असून आता सर्व रस्ते सहापदरी होतील. सर्व नगरकर आतुरतेने वाट पहात असलेला स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाची निविदा महिन्याभरात निघणार आहे. हा पूल झाला की वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. 

स्वच्छता अभियानात उपमहापौर छिंदम, मनपा उपायुक्त भालचंद्र बेहेरे, आरोग्याधिकारी पैठणकर, महिला आघाडी अध्यक्ष गीतांजली काळे, सरचिटणीस किशोर बोरा, नगरसेविका मालन ढोणे मनीषा काळे, विश्वनाथ पोंदे, कालिंदी केसकर, जालिंदर तनपुरे, वसंत राठोड, गणेश साठे, सुभाष साळवे, निर्मला भंडारी, राजू घोरपडे, किशोर कातोरे, नरेश चव्हाण आदी सहभागी झाले होते. खासदार गांधी यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. 

सर्किट टुरिझम 
नगरशहर जिल्ह्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक, धार्मिक सामाजिक कार्याचा मानदंड ठरलेल्या ठिकाणांना पर्यटकांनी भेट द्यावीे, यासाठी सर्किट टुरिझम योजना राबवण्यात येणार आहेे. त्याचा फायदा नगर जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी होईल, असे खासदार गांधी म्हणालेे. 

बागरोजा परिसरात स्वच्छता अभियान राबवून नव्या वर्षाचे स्वागत करताना खासदार दिलीप गांधी, उपमहापौर श्रीपाद छिंदम अन्य मान्यवर.

- आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे होणार सर्व महामार्ग 
- ऐतिहासिक वास्तूंसाठी सीएसआरमधून निधी 
- उड्डाणपुलाची निविदा महिनाभरात निघणार 
- भुईकोट किल्ल्याच्या विकासाला येणार गती 
बातम्या आणखी आहेत...