आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर : कोट्यवधी किमतीचे बेग पटांगण पडीक, महापालिकेचे कारवाईकडे दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुन्या महापालिकेजवळील पडीक पडलेले बेग पटांगण. - Divya Marathi
जुन्या महापालिकेजवळील पडीक पडलेले बेग पटांगण.
नगर- शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बेग पटांगणच्या एक एकर जागेकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अनेक वर्षांपासून ही जागा बेवारस पडली आहे. या जागेवर बांधकाम करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून परवानगी घेण्याबाबत महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत. परिणामी या बेवारस जागेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. दरम्यान, या जागेचा एक कोपरा (चौक) सुशोभित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित जागा आणखी काही वर्ष पडिकच राहणार आहे. 
 
व्यापारी संकुल आणि शैक्षणिक उद्देशासाठी आरक्षित असलेल्या जुन्या महापालिका इमारतीजवळील बेग पटांगणची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील या जागेवर बांधकामासाठी लागणारी वाळू, विटा, खडी, मुरूम, तसेच भंगारातील साहित्य पडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जागेचा बेकायदेशीर वापर सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, बाजारभावाप्रमाणे कोट्यवधी रुपये किमत असलेली बेग पटांगणच्या सुमारे एक एकर जागेची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. त्याचा गैरफायदा शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांनी घेतला आहे. बांधकामासाठी लागणारी वाळू, विटा, खडी, मुरूम आदी साहित्याचा बेकायदेशीर साठा बेग पटांगणात करण्यात आला आहे. त्यासाठी मनपाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. शहराच्या बाहेरून आणलेल्या बांधकाम साहित्याचा बेग पटांगणात साठा करून ते गरजेप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांना पुरवण्यात येते. 
 
मनपाच्या बांधकाम आणि आरोग्य विभागाचे साहित्यही याच ठिकाणी ठेवण्यात आले असून त्याच्या संरक्षणासाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. मनपाचे साहित्य तेथून चोरीला जाण्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. सुमारे एक एकर जागा असलेल्या बेग पटांगणवर अनेकांची नजर आहे. या जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्या व्यावसायिकांना राजकीय पाठबळ मिळत आहे. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांकडून या व्यावसायिकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येते. आता जागेच्या एका कोपऱ्याचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. उर्वरित जागेचा प्रश्न मात्र आणखी काही वर्षे तसाच प्रलंबित राहणार आहे. 
 
महापालिकेचे कारवाईकडे दुर्लक्ष 
बेग पटांगणवर मनपाच्या बांधकाम विभागाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. त्याच्या संरक्षणासाठी या विभागाने एका कर्मचाऱ्याची नेमणूकही केली आहे. कर्मचारी असतानाही बांधकाम व्यावसायिक जागेचा अनधिकृत वापर करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात येते, तर बेग पटांगणात ठेवण्यात आलेले बांधकाम साहित्य हटवण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाची असल्याचे बांधकाम विभाग सांगत आहे. त्यातच वरिष्ठ अधिकारी पदाधिकाऱ्यांनादेखील येथील समस्या जागेबाबत काहीच देणे-घेणे नाही. 
 
गाळे बांधण्यासाठी दोनशे जणांकडून पैसे 
राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार बेग पटांगणात गाळे बांधून ते व्यावसायिकांना देण्यात येणार होते. त्यासाठी मनपाने दोनशे जणांकडून प्रत्येकी ६० हजारांची अनामत रक्कम घेतली होती. परंतु बेग पटांगणजवळ ऐतिहासिक ‘न्यामतखानी दरवाजा’असल्याने गाळे बांधण्यात अडचणी आल्या. नियमानुसार ऐतिहासिक वास्तूजवळ कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे गाळे बांधण्यासाठी घेतलेली अनामत रक्कम परत देण्यात आली आहे. महापालिका, नगरविकास पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने हा प्रश्न सुटू शकेल, परंतु त्यासाठी लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...