आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाचशे, हजारच्या नोटांनी तरली महानगरपालिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अार्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला चलनातून बंद झालेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटांनी तारले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर महापालिकेच्या तिजोरीत सुमोर दहा कोटींचा मालमत्ता कर जमा झाला. गुरूवारी एकाच दिवसात सायंकाळपर्यंत सुमारे एक कोटीचा कर जमा झाला होता. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने गुरूवारी मध्यरात्रीपर्यंत पाचशे हजारच्या नोटा मालमत्ता करापोटी स्वीकारल्या. बड्या थकबाकीदारांनी मात्र या सवलतीकडे पाठ फिरवली. आता त्यांच्या विरोधात प्रशासनाला कठोर पवित्रा घ्यावा लागणार आहे.
केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाने महापालिकेची झोळी कोट्यवधी रुपयांनी भरली आहे. नगरकरांकडे महापालिकेचा सुमारे १८४ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे. उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाल्याने ही थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर होते. केंद्र सरकारने पाचशे हजारच्या नोटा चलनातून बाद केल्या, तरी मालमत्ता करापोटी त्या स्वीकारण्याचे आदेश महापालिकांना दिले. या संधीचा फायदा घेत थकबाकीदारांनी पैसे भरण्यासाठी महापालिका कायार्यालयात रांगा लावल्या. आतापर्यंत सुमारे दहा कोटी रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारण्यासाठी २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शेवटची मुदत होती. प्रशासनाने केडगाव, बुरूडगाव, शहर, झेंडीगेट, सावेडी, नागापूर या ठिकाणी मालमत्ता कर भरणा केंद्र सुरू केले होते. गुरूवारी शेवटच्या दिवशी सायंकाळपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत सुमारे एक कोटीचा कर जमा झाला होता. मध्यरात्रीपर्यंत हा आकडा सव्वा कोटीपर्यंत जाण्याची शक्यता होती. महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत दहा कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाली, अशी माहिती मिळाली.

दरम्यान, पाचशे हजार रुपयांच्या नोटा मालमत्ता करापोटी भरण्याची सवलत मिळूनही शहरातील बडे थकबाकीदार पैसे भरण्यासाठी पुढे आले नाहीत. ज्या बड्या थकबाकीदारांनी सवलत मिळूनही पैसे भरलेले नाहीत, अशांची माहिती प्रशासनाने जमा केली आहे. या थकबाकीदारांच्या विरोधात कारवाईचा कठोर पवित्रा घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काळात बडे थकबाकीदार प्रशासनाच्या रडारवर असतील. करापोटी अल्पावधीत मोठी रक्कम जमा झाल्याने महापालिका प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

दरम्यान, पुढील पाच किंवा दहा वर्षांचा मालमत्ताकर आगाऊ भरण्याची सुविधा महापालिकेने दिली असती, तर यापेक्षा मोठ्या प्रमाणात कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला असता, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बड्या थकबाकीदारांचे काय?
नोटाबंदीच्यानिर्णयानंतर सर्वसामान्य नगरकरांनी आपल्याकडे असलेल्या पाचशे, हजारच्या नोटा मालमत्ता करापोटी महापालिकेत जमा केल्या. मात्र, ज्यांच्याकडे दहा लाखांपासून एक कोटीपेक्षा अधिक मालमत्ता कर थकीत आहे, असे बडे थकबाकीदार कर भरण्यासाठी फिरकले नाहीत. अशा बड्या थकबाकीदारांची माहिती प्रशासनाने जमा केली, परंतु बड्या थकबाकीदारांच्या विरोधात नेमकी काय भूमिका घ्यायची, याबाबत प्रशासन अजूनही तळ्यात-मळ्यातच आहे.

जमा रकमेकडे सर्वांचेच डोळे
करापोटी जमा झालेल्या सुमारे दहा कोटींच्या रकमेकडे काही पदाधिकाऱ्यांसह ठेकेदार कर्मचारी डोळे लावून बसले आहेत. या रकमेतून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्याचे निश्चित झाले आहे. उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी ही रक्कम पाणी योजनेसाठी वापरण्याची मागणी केली, तर ठेकेदार या रकमेतून आपल्या थकीत बिलांची मागणी करत आहेत. महापालिका कर्मचारीदेखील या निधीकडे डोळे लावून बसले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...