आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPECIAL : नगर-कल्याण रेल्वेमार्ग सर्वेक्षणाचे काम पूर्ण; पैसा, वेळ वाचणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
ओतूर (जि. नगर) - नगर, पुणे व ठाणे या तीन जिल्ह्यांच्या ग्रामीण भागासह भविष्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरू शकणाऱ्या व तब्बल २२ वर्षांपेक्षा अधिक वर्षे रखडलेल्या नगर- माळशेजमार्गे- कल्याण रेल्वे मार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण मे महिन्यात पूर्ण झाले अाहे. या मार्गावर एकूण २६ रेल्वे स्थानके प्रस्तावित आहेत. जनतेबरोबरच रेल्वेच्या दृष्टीनेही फायद्यात दाखवण्यात आल्यामुळे अाता या रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.  
 
हा मार्ग सुरू झाल्यास नगर ते कल्याण अंतर रेल्वेने अवघ्या  साडे तीन ते चार तासांत कापणे शक्य होणार आहे. मराठवाड्यातील जनताही नगरमार्गे खूप कमी वेळेत मुंबईला जाऊन शकणार आहे.  हा मार्ग नगर, ओतूर, माळशेज घाट, मुरबाड, अंबरनाथ व कल्याण असा जाणार आहे.  सर्वेक्षण करणाऱ्यांनी हा रेल्वे मार्ग पूर्णतः फायद्यात असल्याचे सांगितल्याची माहिती समजली. सध्या या तांत्रिक सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल आला असला, तरी अंतिम अहवाल तयार झाल्यानंतरच तो रेल्वे बोर्डासमोर मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. त्याला मान्यता मिळण्याची आता औपचारिकता बाकी  आहे. माळशेज रेल्वे सुरू झाल्यानंतर ठाणे, पुणे व नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मुंबईची बाजारपेठ जवळ येणार अाहे. त्यामुळे वाहतूक खर्च व वेळ याची बचत होणार आहे. शिवाय माल वाहतुकीचा नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. या पलीकडे नगर - औरंगाबादमार्गे पुढे विशाखापट्टणम हा मार्गदेखील जवळ होऊन जोडला जाऊ शकतो. त्यामुळे हा नवा माळशेज रेल्वे मार्ग ठाणे, पुणे व नगर या तिन्ही जिल्ह्यांसह मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या विकासाचे नवीन पर्व घेऊन येणार आहे.  
 
पैसा, वेळ वाचणार
नगर-बीड-परळी मार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्याच्याबरोबर कल्याण रेल्वेमार्गही पूर्ण झाला, तर मराठवाड्यातील जनतेचा मुंबईला जाण्यासाठीचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. या शिवाय नगर, पुणेसह मराठवाड्यातील शेतमालही कमी वेळेत मुंबईला पोहाेचू शकेल.
 
बातम्या आणखी आहेत...