आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेकडून महापौरपदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग, आघाडीत शांतता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अवघ्यादीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीच्या निकालामुळे या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. युती-आघाडीच्या वतीने पक्षीय बलाबलाची राजकीय गणिते मांडण्यास सुरूवात झाली आहे. महापौरपदाचे दावेदार अनेक असले, तरी उघडपणे बोलण्यास अद्याप कोणीच तयार नाही. केवळ सत्ता आमचीच येणार म्हणून युती-आघाडीचे नेते दंड थोपटत आहेत. त्यामुळे महापौरपदाची ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले.

शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आतापर्यंतचे महापौरपद आले. राष्ट्रवादी काँग्रेसने तीनदा, सेनेने दोनदा काँग्रेसने एकदाच हे पद भोगले. आता जूनमध्ये पुन्हा एकदा महापौरपदासाठी निवडणूक होत आहे. सर्वसाधारण महिला गटासाठी हे पद राखीव आहे. त्यात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. सेनेने पुन्हा एकदा महापौरपदावर दावा केला आहे. नुकत्याच झालेल्या दोन्ही पोटनिवडणुकांत मिळालेल्या यशामुळे शिवसेना प्रबळ दावेदार असली, तरी आघाडीही मागे हटणार नाही. सेनेत तर अनेकजण आतापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात अनिता राठोड, सुनीता फुुलसौंदर, दीपाली बारस्कर, सुरेखा कदम, अाशा बडे अशी अनेक नावे आहेत. आघाडीकडून मात्र एकमेव विद्यमान उपमहापौर सुवर्णा कोतकर प्रबळ दावेदार आहेत.
विधानसभा निवडणुकीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कोतकर यांना महापौरपदाचा शब्द दिला असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळला, तर आघाडीकडून कोतकर याच एकमेव प्रबळ दावेदार ठरणार आहेत. सेनेत मात्र आतापासूनच गट-तट निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यात दावेदारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत यश मिळूनही ही निवडणूक शिवसेनेसाठी सोपी ठरणार नाही.

सर्वाधिक बलाबल राष्ट्रवादी काँग्रेसकडे असले, तरी प्रभाग ११ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला एक जागा गमवावी लागली. त्यात गटनोंदणीत सहभागी असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे हे पक्षापासून अलिप्त आहेत. असे असले तरी मनसेचे तीन हुकमी एक्के अद्याप तरी राष्ट्रवादीच्याच गोटात आहेत. मनसे नगरसेवक िकशोर डागवाले यांनी सेनेत प्रवेश केला, शिवाय प्रभाग ११ मधील राष्ट्रवादीची जागाही सेनेच्या ताब्यात आली. त्यामुळे सेनेचे बलाबल वाढले आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीत युती-आघाडीत तुल्यबळ लढत होणार हे स्पष्ट आहे.

काँग्रेसचे दोन नगरसेवक अलिप्त
जून २०१५ मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत काँग्रेसचे संजय लोंढे मुदस्सर शेख हे दोन नगरसेवक अलिप्त होते. या निवडणुकीतही हे दोघे अलिप्त राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या गटनेतेपदी सुवर्णा कोतकर यांची निवड झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दोन्ही नगरसेवकांनी काँग्रेसच्या गटनोंदणीशी आमचा काहीच संबंध नसल्याचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

शिवसेनेला सत्तेचा लाभ होणार नाही
जून २०१५ मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत सेना-भाजपने राज्यातील सत्तेचा लाभ घेत आघाडीसमोर अडचणी निर्माण केल्या होत्या. खोटी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याने अजिंक्य बोरकर अनिता भोसले यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची खेळी सेना-भाजपने ऐनवेळी केली होती. या महापौर निवडणुकीत मात्र सेना-भाजपला राज्यातील सत्तेचा फायदा घेता येणार नाही. त्यांना आघाडीशी सरळ लढत द्यावी लागणार आहे.