आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा राष्ट्रवादीला पुन्हा धक्का, विजय तर मिळाला; पण धोका अंतर्गत संघर्षाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एक धक्का दिला. प्रभाग मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा भांगरे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्णा गायकवाड यांचा दणदणीत पराभव केला. नुकत्याच झालेल्या प्रभाग ११ मधील प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला होता. दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक युती-आघाडीसाठी महत्त्वाची होती. त्यात सेनेने बाजी मारली.

प्रभाग चे नगरसेवक विजय भांगरे यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्या पत्नी प्रतिभा भांगरे यांना विजय मिळवून दिला. रविवारी झालेल्या या निवडणुकीत अवघे ४६ टक्के मतदान झाले. सेनेच्या भांगरे यांना हजार ६०१, राष्ट्रवादीचे गायकवाड यांना हजार २५३, तर अपक्ष उमेदवार अनिता दळवी यांना अवघे ३५ मते मिळाली. विशेष म्हणजे ७३ मतदारांनी "नोटा'चा वापर केला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग मध्ये सेनेचे दोन्ही नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी विजय भांगरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. विजय भांगरे यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय ठोंबरे यांचा सुमारे दीड हजार मतांनी पराभव केला होता. या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला होता. प्रभाग ११ मधील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीने सेनेच्या प्रतिभा भांगरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक कार्यकर्त्यांनी मात्र भांगरे यांना निवडून आणण्याचा विडा उचलला होता. सेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, उपनेते अनिल राठोड यांच्यासह सर्व ज्येष्ठ नगरसेवक कार्यकर्त्यांनी प्रभागात तळ ठोकला होता. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप महापौर अभिषेक कळमकर यांनीदेखील गायकवाड यांच्या प्रचारासाठी प्रभाग पिंजून काढला. १० हजार ७२६ नागरिकांना मतदाराचा अधिकार होता. प्रत्यक्षात मात्र निम्म्यापेक्षा कमी नागरिकांनीच मतदानाचा अधिकार बजावला.

सेनेचा आनंदोत्सव
विजयीउमेदवार प्रतिभा भांगरे सर्वसामान्य कुटुंबातील अाहेत, त्यांच्या प्रचाराचा सर्व खर्च पक्षानेच केला. सेनेच्या नगरसेवकांनीदेखील प्रचाराच्या खर्चासाठी वर्गणी जमा केेली होती. भांगरे यांचा विजय हाच एकमेव उद्देश समोर ठेवून सेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक कार्यकर्ते कामाला लागले होते. विजयानंतर या सर्वांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. शिवालयापासून प्रभागातील विविध भागात गुलालाची उधळण करत फटाकेही फोडण्यात आले.

बारस्करांना झाले अश्रू अनावर...
दोनवर्षांपूर्वी सेनेने प्रभाग या जागेसाठी सर्वसामान्य कार्यकर्ता विजय भांगरे यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीत त्यांच्या जोडीला दीपाली बारस्कर होत्या. बारस्कर यांचे पती नितीन बारस्कर यांनी भांगरे यांना मोठी मदत केली होती. भांगरे यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीतही बारस्कर यांनी प्रतिभा भांगरे यांना मदत केली. त्यामुळे भांगरे यांचा विजय बारस्कर यांच्यासाठी महत्त्वाचा होता. प्रतिभा भांगरे विजयी घोषित होताच नितीन बारस्कर यांना अश्रू अनावर झाले.

महापालिकेच्या दोन्ही पोटनिवडणुकांत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत केले. प्रभाग ११ मधील विजयाने हत्तीचे बळ मिळालेल्या सेनेने प्रभाग मध्येही दणदणीत विजय मिळवला. सेनेचे हे हत्तीचं बळ दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापौर निवडणुकीत कामी आले, तर महापालिकेवर पुन्हा भगवा फडकणार हे निश्चित. परंतु सेनेत सध्या सुरू असलेली अंतर्गत धुसफूस वेळीच थांबली नाही, तर हे हत्तीचं बळ गळून पडण्यास देखील वेळ लागणार नाही. जून २०१५ मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत सेनेने राज्यातील सत्तेचा फायदा घेत महापौरपदाचे स्वप्न पाहिले. परंतु त्यांचे हे स्वप्न आघाडीसह मनसेच्या नगरसेवकांनी धुळीस मिळवले. आता जून २०१६ मध्ये पुन्हा महापौर निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकणारच... असा "पण' सेनेचे मोजके पदाधिकारी नगरसेवक बोेलून दाखवत आहेत. दुर्लक्षित नगरसेवक शिवसैनिक मात्र सेनेत कशी अंतर्गत धुसफूस सुरू आहे, यावरच बोलण्यास अधिक पसंती देतात. जूनमध्ये झालेली महापौर निवडणूक असो की, मनसेचे नगरसेवक किशोर डागवाले यांचा सेना प्रवेश, सेनेतील धुसफूस चव्हाट्यावर आली होती. महापौर निवडणूक दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांना शहरात तळ ठोकावा लागणे, हे त्याचेच द्योतक आहे. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत प्रभाग ११ मधील सेनेचे उमेदवार योगिराज गाडे यांचा सुनियोजित पराभव आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत गाडे यांच्याच विजयासाठी आटापिटा करणाऱ्या सेनेला आता शिवसैनिक जाब विचारायला शिकले आहेत. एका पदाधिकाऱ्याच्या विराेधात, तर काही नगरसेवक शिवसैनिकांनी थेट "मातोश्री'पर्यंत तक्रारी केल्या. ही धुसफूस सेनेसाठी निश्चितच चांगली नाही. सर्वसामान्य शिवसैनिकाला अाजही लढ म्हणण्याची गरज नाही, दोन्ही पोटनिवडणुकीतील विजय हे त्याचेच उदाहरण आहे. या विजयातून सेनेला हत्तीचं बळ मिळालं, आता हेच बळ महापालिकेवर भगवा फडकवण्याच्या कामी आलं पाहिजे, हीच सर्वसामान्य शिवसैनिकाची अपेक्षा आहे. त्यासाठी सेनेला अंतर्गत धुसफुशीकडे लक्ष देऊन त्यातून मार्ग काढावा लागणार आहे; अन्यथा सेनेचं हत्तीचं बळ गळून पडायला वेळ लागणार नाही, हे तितकेच सत्य आहे.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, फोटोज.....