आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या मानगुटीवर थकीत वीजबिलाचे भूत, वर्षभरात भरले 18 कोटी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेच्या मागे गेल्या अनेक दिवसांपासून थकीत वीजबिलाचा ससेमिरा सूरू आहे. महावितरणची महापालिकेकडे सुमारे दिडशे कोटी रुपयांची जूनी थकबाकी आहे. या थकबाकीचे कारण पुढे करत महावितरण महापालिकेवर वारंवार दबाव टाकत आहे.
 
पैसे भरा अन्यथा शहर पाणी योजनेचा वीजपुरवठा बंद करू, असे इशारे महावितरण वारंवार देत आहे. महावितरणने पुन्हा एकदा हा इशारा दिला होता. शनिवारी (१५ जुलै) मध्यरात्री पाणी योजनेचा वीजपुरवठा तोडणार असल्याचे पत्र महावितरणने दिले होते. दरम्यान महापालिकेने वर्षभरात सुमारे १८ कोटींचे वीजबिल भरूनही महावितरण महापालिकेला वेठीस धरत आहे.
 
महापालिकेची अर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही महापालिकेने महावितरणला थकीत वीजबिलापोटी शनिवारी ५० लाख रुपये दिले. चार- पाच दिवसांपूर्वी देखील ७५ लाख रुपये दिले. वर्षभरात सुमारे १८ कोटी रुपयांचे वीजबिल भरूनही महावितरण महापालिकेवर दबाव टाकण्याचे काम करत आहे. त्यासाठी थेट शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेचा वीजपुरवठाच तोडण्याचा इशारा वारंवार दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी महावितरणने पाणी योजनेचा वीजपुरवठा तोडला होता. त्यामुळे संतापलेल्या सत्ताधारी विरोधकांनीही महावितरणच्या अधिकाऱ्यांचा समाचार घेतला होता. आमदार संग्राम जगताप यांनी तर थेट उर्जा मंत्र्यांकडे तक्रार केली, त्यानंतर तोडलेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. आता महावितरणने पुन्हा पाणी योजनेचा वीजपुरवठा तोडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मनपाने तातडीने ५० लाख भरले. मनपाकडे जुनी थकबाकी असली, तरी चालू वीजबिल मनपा नियमितपणे भरत आहे. असे असतानाही महावितरण मनपासह शहराला वेठीस धरण्याचे काम करत आहे.
 
पाणीपुरवठा राहणार सुरळीत
शहराचा पाणीपुरवठा मागील काही दिवसांपासून विस्कळीत झालेला आहे. मुख्य जलवाहिनी सलग दोन वेळा फुटल्याने नगरकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. तीन- चार दिवसांपासून सुरळीत झालेला हा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकेने तातडीने महावितरणला ५० लाख रुपये वीजबिलापोटी दिले. त्यामुळे खंडीत होणारा नगर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे.