आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार निधीचा हिशेब नगरसेवकांना विचारा; सत्ताधारी-विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आमदार निधीचा हिशेब विचारणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी नगरसेवकांना हा हिशेब विचारायला हवा. भवानीनगरचा रस्ता कोणी प्रस्तावित केला, त्यावेळी महापौर कोण होते हे पाहणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही अन् अधिकारीही त्यांना माहिती देत नाही, असा अारोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. 
 
रस्त्याच्या कामावरून आमदार संग्राम जगताप महापौर सुरेखा कदम यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आमदार निधीच्या हिशेबाचा मुद्दा विरोधकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वतीने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी सभागृह नेते कुमारसिंह वाकळे, गटनेता संपत बारस्कर, नगरसेवक आरिफ शेख आदी उपस्थित होते. 
 
पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी सांगितले, महापालिकेत गुरूवारी राष्ट्रवादीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आल्यानंतर महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर आरोप केले. भवानीनगरचा रस्ता आमदार निधीतून कोणती कामे झाली, असाही प्रश्न करण्यात आला. निधी वापरायला जिल्हाधिकारी परवानगी देतात, पण महापौरांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मुळात सत्ताधाऱ्यांना हे दीड वर्ष कसे गेले याचे भान राहिले नाही. ४० कोटींचा निधी आणला असे ते म्हणतात. शहरासाठी बाहेरून निधी येत असताना ते म्हणतात, आम्ही पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. वास्तविक जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला तीन पत्रे दिली आहेत. आमदार निधी कोठे खर्च झाला, हे त्यांनी वॉर्डात फिरून पहावे. या निधीतून आतापर्यंत रस्ते, हायमॅक्स, समाज सभागृह, ओपन स्पेस सुशोभीकरणासाठी खर्च झाला. सत्ताधाऱ्यांनी आमदार निधीचा हिशेब त्यांच्याच नगरसेवकांना विचारावा. त्यांची अडीच दशक म्हणजे २५ वर्षात त्यांनी केलेला विकास आणि आम्ही अडीच वर्षात केलेला विकास तपासा, त्यात आमचा विकास जास्तच असेल, असे राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले. दर वर्षी रस्त्यांच्या पॅचिंगवर मोठा खर्च होतो. वास्तविक या कामासाठी समिती स्थापन करून त्याचे मूल्यमापन करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. 
 
अभ्यास करून बोला.... 
भवानीनगरमधीलरस्त्याचे काम मूलभूत सुविधा योजनेंतर्गत मंजूर झाले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न समोर आला. त्यासाठी आमदार जगताप यांनी डिसेंबर २०१६ पासून पाठपुरावा केला. परंतु महापौरांनी आठ महिने उलटूनही या रस्त्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर केला नाही. त्यामुळे महापौरांचा हा आरोप निरर्थक आहे. मूलभूत अंतर्गत नव्वदपेक्षा अधिक रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी भवानीनगर हा एक रस्ता आहे. महापौर कदम यांनी अभ्यास करून बोलावे. आपली चूक झाकण्यासाठी निरर्थक आरोप करू नयेत, असे गटनेता संपत बारस्कर म्हणाले. 
 
या नगरसेवकांच्या प्रभागात खर्च 
आमदार निधीतून विविध प्रभागांत कामे झाली आहेत. त्यात दीपाली बारस्कर, सागर बोरुडे, शारदा ढवण, अशोक बडे, उषा ठाणगे, वीणा बोज्जा, दत्ता कावरे, महेश तवले, मनीष साठे, अनिल बोरुडे, सुवर्णा जाधव, उषा नलावडे, सुवेंद्र गांधी, मनीषा काळे, स्वप्नील शिंदे, सचिन जाधव यांच्या प्रभागांत आमदार निधी खर्च झाला. तो तुम्हीच शोधा असा टोलाही माजी महापौर अभिषेक कळमकर, संपत बारस्कर यांनी लगावला. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या तीन रस्त्यांची कामे केवळ महापाैरांमुळेच रखडली आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी तीनवेळा पत्र देऊनही महापौरांनी या रस्त्यांच्या कामाचा विषय महासभेच्या अजेंड्यावर घेतला नाही. रस्त्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून मोठ्या स्वरूपात निधी मिळणार होता. या कामासाठी आमदार जगताप यांनी पाठपुरावा केला. कामाचे श्रेय त्यांना मिळू नये, या हेतुमुळे महापौरांनी हा विषय मागे ठेवला आणि तेच आता आमदार जगताप यांच्यावर कुरघोडीचे राजकारण करत असल्याचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...