आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्रे, बंद दिवे अन् कचऱ्यावर पाच तास रवंथ; महापौरांनी केले सर्व विषय मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेली महासभा नागरी प्रश्नांवरच गाजली. मोकाट कुत्रे, बंद दिवे, कचरा, नालेसफाई अशा अनेक प्रश्नांबाबत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महासभा बोलावण्यात आल्याने नगरसेवकांनी पोटतिडकीने प्रश्न मांडले. तब्बल पाच तासांनंतरही नागरी समस्यांवरील चर्चा संपल्याने वैतागलेल्या महापौर कदम यांनी सायंकाळी सर्व विषयांना मंजुरी देत सभा आटोपती घेतली. 
 
सत्ताधारी विरोधकांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. महासभेतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता होती. परंतु सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तपोवन रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव मंजूर करावा, यासाठी नगरसेविका शादा ढवण यांच्या कार्यकर्त्यांनी सभा सुरू होण्यापूर्वीच पावन गणतीला अभिषेक घातला. सभेच्या सुरुवातीला सावेडी बसस्थानकाच्या जागेवरील सामाजिक न्याय भवनाच्या उभारणीत अडचण ठरणाऱ्या रस्त्याचा प्रश्न उपस्थित झाला. हा रस्ता रद्द करावा, या मागणीसाठी सुरेश बनसोडे अशोक गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह सभागृहासमोर आंदोलन केले. नगरसेवक विजय गव्हाळे, संपत बारस्कर, कुमार वाकळे, अभिषेक कळमकर, संजय घुलले, अरिफ शेख, दीप चव्हाण आदींनी हा विषय लावून धरला. न्याय भवनासाठी अडचणीचा ठरणारा हा १८ मीटरचा रस्ता रद्द करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. रस्ता रद्द करण्याचा ठराव मंजूर करून तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सभेने घेतला. 
 
नगरसेविका मालन ढोणे यांनी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. नंतर सर्वच नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दराेज िकती कुत्रे पकडली, याचा दैनंदिन आढावा घेण्याच्या सूचना आयुक्त मंगळे यांनी संबंधितांना दिल्या. प्रभागातील बंद दिव्यांबाबत सर्वच नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. नगरसेवक विपुल शेटिया यांनी कोठी रस्त्यावरील सर्वच पथदिवे बंद असल्याचे सांगितले. परंतु विद्युत विभागप्रमुखांनी दिवे सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या शेटिया यांनी दिवे सुरू असल्यास राजीनामा देईन, सभागृहाला खोटी माहिती देऊ नका, असे सांगत त्याची कानउघाडणी केली. 
 
नगरसेविका दीपाली बारस्कर, मनीषा काळे, तसेच कुमार वाकळे, सुनील कोतकर यांनी नालेसफाईचा मुद्दा उपस्थित केला. सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत नागरी समस्यांवरील चर्चा सुरूच होती. अखेर महापौर कदम यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करत सभा आटोपती घेतली. 
 
कत्तल खान्यासाठी जागा 
शहरअनधिकृतकत्तलखाने बंद करावेत, अशी मागणी योगिराज गाडे यांनी केली. अनेक नगरसेवकांनी मनपाच्या कत्तलखान्याबाबत प्रश्न उपस्थित केला. मनपाच्या मालकीच्या पिंपळगाव किंवा अन्य जागी कत्तलखाना सुरू करावा, अशी मागणी सचिन जाधव, दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे आदींनी केली. पाहणी करून जागा निश्चित करणार असल्याचे महापौर आयुक्तांनी सांगितले. 
 
एकही दिवस मोर्चाविना नाही 
नागरीसमस्यांबाबत सर्वच नगरसेवक सभागृहात पोटतिडकीने बोलत होते. अायुक्त मंगळे मात्र शांतपणे सर्व चर्चा ऐकत हाेते. त्यामुळे संतापलेल्या दीप चव्हाण यांनी आयुक्तांना बोलण्यास सांगितले. पदभार घेऊन एक महिना झाला, परंतु आतापर्यंत एकही दिवस मोर्चाविना गेला नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत आहे, हे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्यावा, वेळप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणार असल्याचे आयुक्त मंगळे यांनी सभेत स्पष्ट केले. 
 
पावन गणपतीला अभिषेक 
सावेडीउपनगरातील कचरा डेपोकडे जाणाऱ्या तपोवन रस्त्याच्या कामासाठी १४ व्या वित्त आयोगांतर्गत निधी मंजूर करावा, या मागणीसाठी दिगंबर ढवण यांनी प्रभागातील नागरिकांसह पावन गणपतीला अभिषेक घातला. सभागृहात रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शारदा ढवण यांनी पेढे वाटले. तपोवन या संपूर्ण रस्त्याच्या कामाचा समावेश करावा, अशी मागणी संपत बारस्कर, रुपाली वारे दीपाली बारस्कर यांनी केली. 
 
मंजूर झालेले प्रमुख विषय 
- आगरकरमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकाचे काटवन खंडोबा चौक असे नामकरण करणे 
- महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला पाच हजार रुपये सानुग्रह 
- अनुदान देणे संपूर्ण पाइपलाइन रस्त्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मार्ग असे नाव देणे 
- जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामास मंजुरी 
- तपोवन रस्त्याच्या कामास १४ वित्त आयोगांतर्गत मंजुरी 
- सशुल्क पे अॅण्ड पार्क. 
 
बातम्या आणखी आहेत...