आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: पाया कच्चा असल्यानेच कोसळले शाळेचे छत, चौकशीत निष्पन्न, 6 अधिकारी दोषी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे छत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर बारा विद्यार्थी जखमी झाले. याप्रकरणी चौकशीत इमारतीच्या बांधकामाचा पाया कच्चा असल्याचे निष्पन्न झाले. त्यास तत्कालीन सरपंचासह सहा अधिकारी-पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. कार्यकारी अभियंत्यांना भिंगार कँप पोलिस ठाण्यात पाठवून माहिती शुक्रवारी सादर करण्यात आली, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी दिली.

दिव्य मराठीने याबाबत दुसऱ्याच दिवशी मातीमिश्रित वाळूमुळे वर्ग कोसळल्याचे वृत्त दिले होते. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा धोकादायक झाल्या असून मोडकळीस अाल्या आहेत. या इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.  २८ ऑगस्ट रोजी शाळा सुटण्यास अवघे काही मिनिटे असताना खोलीचे छत कोसळले. या घटनेत तीन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर जिल्ह्यासह राज्यभरात प्रशासकीय यंत्रणेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. 

या प्रकरणी तत्काळ चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी दिले होते. सखोल चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या दोन कार्यकारी अभियंत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान, मृत मुलांच्या वारसांना पालकमंत्री राम शिंदे यांनी चार लाखांचे धनादेश दिले. राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेंतर्गत सुमारे ७५ हजार रुपये देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

दोन्ही कार्यकारी अभियंत्यांनी युद्धपातळीवर चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर केला. छत कोसळलेल्या वर्गखोलीचे बांधकाम १९९८ ते २००१  या कालावधीत झाले होते. जवाहर रोजगार योजनेंतर्गत ग्रामपंचायतीने मजुरांमार्फत हे काम पूर्ण केले. याप्रकरणी तत्कालीन सरपंच, दोन ग्रामसेवक, एक शाखा अभियंता, तसेच दोन उपअभियंते संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे जिल्हा परिषदेतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी एक ग्रामसेवक व संगमनेर तालुक्यात कार्यरत शाखा अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...