आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर : दूषित स्त्रोत 127, तरीही 12 ग्रामपंचायतींनाच लाल कार्ड; शाब्दिक खेळात घोळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात जलजन्य आजारांचा धोका वाढता असताना दरमहा तयार केल्या जाणाऱ्या अहवालानुसार जिल्ह्याचे आरोग्य पत्रक ठरवले जाते. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून सरासरी १२७ जलस्त्रोतांचे नमुने दूषित आढळले आहेत. तथापि, तीव्र जोखमीच्या ग्रामपंचायती अवघ्या बारा ठरवण्यात आल्या. हा विरोधाभास असल्याने जिल्हा पाणी स्वच्छता मिशन, तसेच आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
एकीकडे जिल्ह्यातील दूषित पाण्याची टक्केवारी वाढली आहे, साथीच्या रोगांचाही उद्रेक होत आहे, पाण्यामध्ये आरोग्यास घातक पदार्थांचे प्रमाण वाढले आहे. जलस्त्रोतांचा परिसर अस्वच्छ झाला असतानाही पाणी स्रोत स्वच्छतेच्या अहवालात मात्र केवळ १२ ग्रामपंचायतींना लाल कार्ड दाखवून उर्वरित ग्रामपंचायतींना क्लीन चीट दिली गेली आहे. 

स्रोतांभोवतीचा परिसर अस्वच्छ असणाऱ्या २३ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले. या अहवालावरून जिल्ह्यातील जलस्त्रोतांसह स्वच्छतेची परिस्थिती एवढी अलबेल आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजूनही शंभर टक्के ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झालेल्या नाहीत. काही गावे कायम दूषित झोनमध्ये असतात. विशेष म्हणजे अशा गावांना तीव्र जोखमीतून यापूर्वी वगळण्यात आले होते. 
 
सर्वेक्षणात जलस्त्रोत परिसर, तसेच पाणी दूषित असणे अस्वच्छता असलेल्या ग्रामपंचायतींना तीव्र जोखमीचे म्हणून लाल, तर त्या तुलनेत कमी अस्वच्छता असलेल्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले जाते. ग्रामपंचायतींनी पाणी स्रोतांच्या परिसराची स्वच्छता केल्याचे पुढील तपासणीत आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतींना कार्ड बदलून हिरवे कार्ड दिले जाते. जिल्ह्यातील सुमारे हजार ३१३ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायती लाल कार्ड (तीव्र जोखमीत), तर २३ (जोखमीच्या) ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले गेले. जिल्ह्यात एप्रिलमध्ये १६५, मे महिन्यात १३१, तर जून महिन्यात १२७ ठिकाणांचे नमुने दूषित आढळले होते. जर दरमहा सव्वाशेपेक्षा जास्त जलस्त्रोतांचे नमुने दूषित आढळून येत असतील, तर लाल पिवळे कार्ड दिल्या जाणाऱ्या ग्रामपंचायती कमी कशा होऊ शकतात असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
 
जिल्ह्यात जलजन्य आजारांचे प्रमाण वाढत अाहे. ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांत गॅस्ट्रो, जुलाब, उलट्या आदी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. 
 
यावर उपाययोजना करण्यासाठी जलसुरक्षकांमार्फत पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले जातात. ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा करताना टीसीएल पावडरचा वापर केला जातो. या पावडरची तपासणी आरोग्य विभागामार्फत केली जाते. टीसीएल पावडर उपलब्ध नसल्याने आरोग्य विभाग ग्रामपंचायतींना सूचना करतो. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. 
 
या गावातील ब्लिचिंग पावडर निकृष्ट आढळली 
पिंपळगाव माळवी, धनगरवाडी (नगर), घोडसरवाडी, नागवाडी, टाहाकरी, समशेरपूर, सावरगाव पाट, सुगांव, कुंभफळ (अकोले), भाळवणी, सावरकर, वनकुटे (पारनेर), सोनेसांगवी, आव्हाणे बुद्रूक, गायकवाड जळगाव, सुलतानपूर (शेवगाव) या गावांत भूवैज्ञानिकांच्या अहवालानुसार ब्लिचिंग पावडरची गुणवत्ता निकृष्ट आढळून आली. 
 
समन्वयाचा अभाव 
ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, जिल्हा पाणी स्वच्छता मिशन यांच्या समन्वयातूनच स्वच्छता आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतु जेव्हा दूषित पाण्यासह कारवाईच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित होतो. त्यावेळी या यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानतात. यामध्ये स्वच्छता मिशन कक्ष समन्वयक, तर आरोग्य ग्रामपंचायत प्रत्यक्ष अंमलबजावणी यंत्रणा आहेत. 
 
जिल्ह्यातील दूषित पाणी असलेली गावे 
वाळूंज, पारगाव, वाटेफळ, बुरुडगाव, सारोळा (नगर), गारवाडी, पिंपळदरी, त्रिशुळवाडी, धांदरमाळ, कोतूळ, धामणवन, बलठण, साकीरवाडी, गोदुंशी, तांभोळ, टाकळी, उंचखडक, सुगाव, रुंभोडी, कोहंडी, मुतखेल, केळुगण (अकोले), आनंदवाडी (जामखेड), धारणगाव, वेस, माहेगाव, यसगाव, टाकळी ब्राह्मणगाव (कोपरगाव), कुकाणा, नांदूर शिकारी, तेलकुडगाव (नेवासे), किन्ही, वेलदरे, भाळवणी, दैठणेगुंजाळ, वडनेर, देवी भोईर, शिरसुले, वडगाव गुंड, निघोज, ढवणवाडी (पारनेर), शिरसाठवाडी, अगस्तखांड, पिंपळगाव टप्पा, येळी, खरवंडीकासार, भारजवाडी, शिरापूर, जवखडे खालसा (पाथर्डी), सावळीविहीर, बुद्रूक कारवाडी (राहाता), बेलकरवाडी, कोळेवाडी, म्हैसगाव, चिखलठाण, शेरी, कोळेवाडी, टाकळी मिया, मुसळवाडी, चांदगाव, लाख, करजगाव, जातप आंबी, केसापूर, अमळनेर, चिंचोली, वांबोरी, तांदुळवाडी, कुक्कडवेढे (राहुरी), अमरापूर, ढोरजळगाव, दहिफळ नवे, दहिफळ जुने, एरंडगाव, भावी निमगाव, देवटाकळी, हिंगणगाव, मजलेशहर, प्रभुवडगाव, बोधेगाव, कानोशी, लाडजळगाव (शेवगाव), रामगड, नाऊर, नायगाव, रामपूर, जाफराबाद, ग्लोबल स्कूल, हरेगाव, भेर्डापूर (श्रीरामपूर), पेमगिरी, मालदाड, अश्वी (संगमनेर) या गावातील पाणी नमुने दूषित आढळून आले. 
 
...तर फेरसर्वेक्षण 
- गुणदान करून गावाच्या स्वच्छेतेनुसार लाल, पिवळे, हिरवे कार्ड दिले जाते. संशयास्पद अहवाल आढळून आल्यास फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या जातात. यापूर्वी लाल झोनमध्ये एकही ग्रामपंचायत नव्हती, या अहवालाचे फेरसर्वेक्षण केले होते. त्यात बदल झाले होते. आता टीसीएल ऑडिट केले जाणार आहे.
'' डॉ.बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी.