आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड कोटीच्या निविदांना मिळाला हिरवा कंदील, ३४ कोटींचा निधी १५ फेब्रुवारीपर्यंत खर्च करा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर दूर झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सुमारे दीड कोटीच्या निविदांचा स्वीकार सोमवारी स्थायी समितीने केला. त्यामुळे कामांना गती मिळणार आहे. दरम्यान, जिल्हा नियोजनकडून उपलब्ध झालेल्या एकूण निधीपैकी ३४ कोटींचा निधी अखर्चित राहिल्यावरून सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, मीरा चकोर, नंदा वारे, सदस्य विठ्ठल लंघे, राजेंद्र फाळके, बाळासाहेब हराळ, सुजित झावरे, सुवर्णा निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१४-२०१५ या वर्षात जिल्हा परिषदेला विभागनिहाय प्राप्त निधी खर्च झालेला निधी याबाबत सभेत माहिती घेण्यात आली. उपलब्ध निधीपैकी ३४ कोटी ९६ लाखांचा निधी अखर्चित राहिल्याचे निदर्शनास आले. हा निधी १५ फेब्रुवारीपर्यंत खर्च करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना देण्यात आल्या. यात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांची बांधकामे, पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने, महिला बालविकास विभागाकडील अंगणवाड्या इमारती, ग्रामपंचायत विभागाकडील वर्ग तीर्थक्षेत्रातील विकास कामे, सार्वजनिक बांधकाम, लघू पाटबंधारे आदी विभागांतील अधिकाऱ्यांना सदस्यांनी अखर्चित निधीवरून चांगलेच फैलावर घेतले.

पदरात कामे पाडून घेण्यासाठी ठेकेदारांची स्पर्धा लागली अाहे. या स्पर्धेमुळे दहा टक्क्यांपेक्षा कमी दराने निविदा भरल्या जात असल्याचे समोर आले. कमी रकमेच्या निविदा मान्य करण्याचे संकेत आहेत, पण होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात सभेत सविस्तर चर्चा झाली. या व्यतिरिक्त पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी उपकेंद्राच्या इमारतीसाठी ३८ लाख ३० हजार अंदाजित रकमेच्या २.६० टक्के जादा दराची निविदा स्वीकृत करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील कोकणगाव-शिवापूर उपकेंद्रासाठी ४१ लाखांची डीएस कन्स्ट्रक्शनची निविदा स्वीकारण्यात आली. या व्यतिरिक्त पिंपळदरी उपकेंद्र, निंबळ (अकोले) येथील अंबिकामाता देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी ३० लाखांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.
या निविदांचा स्वीकार
कामाचे प्रकार रक्कम

ढवळेवाडी उपकेंद्र - ३८२९७३७
कोकणगाव शिवापूर - ४१६४५२५
पिंपळदरी उपकेंद्र - ४१८६०४९
अंबिकामाता तीर्थक्षेत्र - २९९९९३२
गणुचा तांडा उपकेंद्र - ३८२९७३७

नैसर्गिक आपत्तीमुळे जळीत झाल्यास दहा हजारांची मदत
नैसर्गिक आपत्तीमुळे घराचे जळीत झाल्यास जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून जळित झालेल्या कुटुंबीयांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा विषय बाळासाहेब हराळ यांनी मांडला. त्याला समितीने मंजुरी देऊन या विषयाला आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या.