आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेसाठी भाजपकडूनही संख्याबळाची जुळवाजुळव, महाआघाडी राष्ट्रवादीवर नाराज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हापरिषदेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असताना सत्तेच्या सातबाऱ्यावर जागांची गोळाबेरीज करण्यासाठी खलबते सुरू झाली आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली, तर सत्ता स्थापनेचा जादुई आकडा पार होऊन संख्याबळ ४१ वर पोहोचणार आहे, परंतु भाजपने अजूनही मैदान सोडले नाही. भाजप गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षासह महाआघाडीच्या संपर्कात आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये बिघाडी झाल्यास संख्याबळाची जुळवाजुळव करताना भाजप काँग्रेसला हाताशी धरणार की राष्ट्रवादीला, हे पाहणे आैत्सुक्याचे ठरणार आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने दिलेला ‘चाळीस प्लस’चा नारा दिवास्वप्न ठरल्याने पक्षाला अवघ्या १४ जागांवर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत भाजपच्या वाट्याला अवघ्या सहा जागा आल्या होत्या. त्यावेळी केंद्रात राज्यात भाजप सत्तेत नव्हता. यंदाच्या निवडणुकीवेळी भाजप देशात आणि राज्यात सत्तेत असल्याचा फायदा होऊन १४ जागा मिळाल्या. काँग्रेसला २३, राष्ट्रवादी काँग्रेसला १८ जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ३७ संख्याबळाचा जादुई आकडा पार करावा लागेल. दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यास आकडा ४१ होतो, सध्यातरी असेच चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी, भाजप, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, जनशक्ती आघाडी, महाआघाडी अशी बेरीज केली, तर संख्याबळ ४० होते. शिवसेना, काँग्रेस, जनशक्ती आघाडी, भाकप, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, महाआघाडी अशी बेरीज केली, तर संख्याबळ ३९ होऊन त्यांनाही सत्ता स्थापन करता येईल. 

सर्व शक्यता पडताळून भाजप, शिवसेना तसेच दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादी पक्षातून गडाख पिता-पुत्र बाहेर पडल्यानंतर त्यांनी पाच जागांवर विजय मिळवला. सत्ता स्थापन करण्यासाठी आता माजी आमदार दादा कळमकर यांनी गडाखांशी चर्चा करून ‘घरवापसी’चे आवाहन केले. पण, चंद्रशेखर घुलेंच्या रूपाने झालेल्या कुरघोडीची सल अजूनही तशीच असल्याचे गडाखांच्या गोटातून समजले. 

दरम्यान, भारतीय जनता पक्ष गडाखांच्या संपर्कात आहे. दुसरीकडे माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाने महाआघाडी करून उमेदवार रिंगणात उतरवले होते. महाआघाडीच्या दोन उमेदवारांचा थोड्या फरकाने पराभव झाला. राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने हा पराभव झाल्याची कुजबुज महाआघाडीच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे दिलीप वळसे यांच्यावरही नाराजीचा सूर निघत आहे. अशा परिस्थितीत महाआघाडीला हाताशी धरण्यासाठी थेट अजित पवारांनाच कानमंत्र द्यावा लागेल. पक्षाकडून गटनोंदणी करण्यात आली नाही. उमेदवार फटू नयेत यासाठी गटनोंदणीला प्राधान्य देणारा राष्ट्रवादी पक्ष गडाख यांच्यासह महाआघाडीची जुळवाजुळव झाल्यानंतर नोंदणी करणार आहे. अशा परिस्थितीत सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. 

२०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस २८ राष्ट्रवादीकडे ३२ जागा होत्या, त्यावेळी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यानंतर सत्ता स्थापन करणे शक्य होते. तशा बैठका झाल्या, पण ऐनवेळी काँग्रेसला धोबीपछाड देत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप शिवसेनेशी हातमिळवणी करून काँग्रेसला सत्तेपासून अडीच वर्षे दूर ठेवले. काँग्रेस याचा बदला घेणार की राष्ट्रवादी याची पुनरावृत्ती करणार, हे पाहणे आैत्सुक्याचे ठरणार आहे. 

दोन्ही काँग्रेस एकत्र बसणार 
दोन्ही काँग्रेस जिल्हा परिषदेत सत्तेत येण्यासाठी एकत्र बसणार होते, परंतु त्यांची शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) होणारी नियोजित बैठक स्थगित झाली. आता पुढील बैठक राष्ट्रवादीचे प्रभारी दिलीप वळसे, माजी आमदार दादा कळमकर, माजी मंत्री मधुकर पिचड, काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात होणार आहे. 

तडजोडींवरच सत्तेची गणिते 
सत्ता स्थापनेत ज्या पक्षाच्या जास्त जागा, त्या पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा उपाध्यक्ष असा फॉर्म्युला आहे. आघाडी गृहीत धरून अध्यक्षपदावर दावा ठोकण्यासाठी राष्ट्रवादीकडून संख्याबळाची जुळवाजुळव सुरू आहे. दरम्यान, आघाडीत बिघाडी झाली, तर विषय समित्यांच्या तडजोडीवर भाजपशी जुळवून घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...