आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भैया, तुमचे कार्यकर्ते ‘टोल’मधून कधी होणार ‘मुक्त’... ?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भय्या,(आमदार संग्राम जगताप) तुमचे काही कार्यकर्ते गेल्या दोन वर्षांपासून खराब महामार्ग त्यावरील टाेलच्या प्रश्नाभोवतीच अडकून पडले आहेत. त्याची उलटसुलट चर्चा शहरभर दबक्या आवाजात सुरू आहे. टोलमुक्तीसाठी केलेल्या आंदोलनांचे फलित चांगलेच झाले. त्यासाठी तुमचे तुमच्या कार्यकर्त्यांचे नगरकर आभारी आहेत, पण आता तुमच्या या आंदोलकांना ‘टोल’ मधून थोडी उसंत मिळाली असेल, तर त्यांनी नगरकरांच्या दैनंदिन प्रश्नांबाबत आंदोलने केली तर बरे होईल. सर्वसामान्य नागरिक आपली खंत थेट तुमच्यासमोर मांडू शकत नाहीत. त्यांची ही खंत तुमच्यासमोर ठेवत आहोत.
भैया, शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे तुम्ही हे समीकरण आता नवीन नाही. शहर जिल्हाध्यक्षपदावर असताना तुम्ही तयार केलेल्या कार्यकर्त्यांची संख्या आता दुपटीने वाढली आहे. काही कार्यकर्ते अालिशान गाड्यांमध्ये फिरत आहेत. खराब महामार्ग टोलच्या विरोधात तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेली आंदोलने नगरकरांच्या निश्चितच फायद्याची आहेत. या आंदोलनांमुळे नगर-कोल्हार रस्त्यावरील टोल बंद करण्यात आला, ही कौतुकाची बाब आहे. परंतु हे कार्यकर्ते वर्षांपासून टोलमध्येच अडकले आहेत.

नगरकरांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व तुम्हीच केले, परंतु तुमच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या अंगावर धूर फवारणी करून स्टंटबाजी केली. त्याबद्दल तुम्ही या कार्यकर्त्यांची खासगीत कानउघाडणीही केली. शहराच्या अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. साधे टँकरचे पाणीदेखील तेथे मिळत नाही. कचऱ्याचे ढीगही वाढत चालले आहेत. कुठे ड्रेनेज फुटले, तर कुठे पथदिवे नाहीत. अधिकारी कर्मचारी तक्रारींची दखल घेत नाहीत. यासारखे अनेक दैनंदिन प्रश्न असताना तुमचे कार्यकर्ते मात्र टोलमध्येच रमले आहेत. मोकाट जनावरांचा प्रश्न वगळता (राष्ट्रवादीची सत्ता असताना) या कार्यकर्त्यांनी सामान्यांसाठी अद्याप एकही आंदोलन केलेले नाही.

भय्या, तुम्ही शहराचे लाडके आमदार आहात. त्यामुळे तुमच्यावरील जबाबदारी मोठी आहे. तुमचे कार्यकर्ते टोलभोवतीच अडकून पडले, तर नगरकरांचे दैनंदिन प्रश्न सुटणार कसे, हा सवाल सर्वसामान्य नगरकरांच्या मनात घर करू पहात आहे. आता म्हणे तुमचे कार्यकर्ते शिरूर रस्त्यासाठी आंदोलन करणार आहेत. ही चांगली बाब आहे, परंतु त्यासाठी थोडी उसंत घेऊन आधी नगरकरांच्या दैनंदिन प्रश्नांसाठी आवाज उठवला तर बरे होईल. ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ हा उपक्रम स्तुत्य आहे, त्यासाठी सर्वच कार्यकर्ते कामाला लागले, तर सर्वसामान्य नगरकरांना निश्चितच दिलासा मिळेल. भय्या, सवालनगरीतील ही खंत सर्वसामान्य नगरकरांची आहे, ज्यांचे तुम्ही लाडके आमदार आहात. बाकी सांगणे लगे. तुम्ही सूज्ञ आहातच...

नगरला बनवा अमेरिकेतील खेडं
भैया,तुम्ही नुकताच अमेरिकेचा दौरा करून तेथील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा अभ्यास केला. तेथे तुम्हाला कार्यकर्तेही पहायला मिळाले असतील, पण रस्त्यांवर खड्डा दिसला नसेल. खड्ड्यांचे शहर म्हणून आपल्या नगरची ओळख आहे, याची आठवण तेथील रस्ते पाहून तुम्हाला वारंवार झाली असेल. शहराचे आमदार म्हणून विकासकामांसाठी तुमचे प्रयत्न सुरूच आहेत. तुम्ही नगर शहराला अमेरिकेतील एखाद्या खेड्याचं जरी रूप दिलं, तरी नगरकर तुमचे कायम ऋणी राहतील...
बातम्या आणखी आहेत...