आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध सेवा शुल्कांसह करवाढ फेटाळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - घनकचरा संकलन शुल्क, वाढीव पाणीपट्टी, तसेच अग्निशमन कर लागू करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. सभापती सचिन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या सभेत त्यावर निर्णय होणार आहे. नागरिकांवरील कराचा वाढता बोजा पाहता या प्रस्तावांना स्थायी सदस्यांकडून विरोध होणार आहे. त्यामुळे वाढीव सेवा शुल्क कराचे प्रस्ताव फेटाळण्यात येण्याची शक्यता अधिक आहे. 
 
महापालिका प्रशासनाने २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात गेल्या वर्षीप्रमाणेच पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, करात वाढ करण्यासाठी अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजूर होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमुळे अंदाजपत्रक वेळेत सादर करणे कठीण आहे. त्यामुळे प्रशासनाने वाढीव सेवा शुल्क कराचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवले आहेत. मागील वर्षी हे प्रस्ताव अंदाजपत्रकातच ठेवण्यात आले होते. यंदा मात्र अंदाजपत्रकाव्यतिरिक्त हे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. शहरातील घनकचरा संकलनाचा बोजवारा उडालेला असतानादेखील प्रशासनाने घनकचरा संकलन सेवाशुल्कात वाढ सूचवली आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक भागात अद्याप पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नसतानादेखील पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मागील वर्षी देखील पाणीपट्टी दुप्पट करण्याचा प्रस्ताव होता, परंतु स्थायी समितीसह महासभेनेदेखील हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. 
 
पाणीपट्टीसह शहरात अग्निशमन कर लागू करण्याचा प्रस्ताव आहे. हे सर्व वाढीव सेवा शुल्क कराचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर गुरुवारी ठेवण्यात येणार आहेत. या प्रस्तावांबाबत स्थायी समितीचे सदस्य काय भूूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवलेले प्रस्ताव पाहता स्थायी सदस्यांचा विरोध होणार आहे. त्यामुळे हे सर्व प्रस्ताव फेटाळण्यात येणार असल्याचीच शक्यता अधिक आहे. स्थायीने हे प्रस्ताव फेटाळले, तर २० फेब्रुवारीनंतर सादर करण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकात कोणताही कर सेवा शुल्क वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवता येणार नाही. परिणामी नगरकरांची वाढीव कर सेवा शुल्कातून मुक्तता होईल.
 
संकुलाच्या निविदा मंजुरीकडे लक्ष 
प्रोफेसर कॉलनी चौकातील महापालिकेच्या जागेवर असलेले गाळे पाडून त्या ठिकाणी नवीन व्यापारी संकुल उभारण्यासाठी ११ कोटी ११ लाख रुपयांची निविदा प्राप्त झाली अाहे. ही निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. परंतु संकुलाची निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे. गाळेधारक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. त्यांचा विराेध झुगारून निविदा मंजूर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
उपमहापौर छिंदम यांनी घातले लक्ष 
उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी प्रोफेसर कॉलनी संकुलाच्या निविदा प्रक्रियेत लक्ष घातले आहे. निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी त्यांनी प्रभारी आयुक्त विलास वालगुडे यांच्याकडे केली. नेहरू मार्केटप्रमाणेच या निविदा प्रक्रियेची परिस्थिती होईल, असेही त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. आयुक्त वालगुडे यांनी नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागवले अाहे. त्यामुळे स्थायी समितीच्या भूमिकेकडे आता संकुलातील गाळेधारकांचे लक्ष लागले आहे. 
बातम्या आणखी आहेत...