आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारुकांडाच्या तपासाचा मार्ग खडतर...आरोपींना नेवाशाला वर्ग करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पांगरमल दारुकांडातील आरोपींना पुन्हा पाेलिस काेठडीत घेण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी दिली. मात्र, त्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पोलिसांना प्रबळ कारण देता आले नाही. त्यामुळे या पाचही आरोपींची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत झाली. या निर्णयामुळे पोलिसांसमोरील तपासाचे आव्हान पुन्हा एकदा खडतर झाले आहे. बनावट दारू तयार करणारे मुख्य आरोपीच न्यायालयीन कोठडीत गेल्यामुळे इतर आरोपींवर आता पोलिसांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. 
 
पांगरमल प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या भीमराज गेणू आव्हाड, रावसाहेब गेणू आव्हाड (दोघेही पांगरमल, ता. नगर), जगजितसिंग किशनसिंग गंभीर, जाकीर कादीर शेख हमीद अली शेख (तिघेही नगर) या आरोपींच्या न्यायालयीन कोठडीचा आदेश रद्द करावा, गुन्ह्याच्या सखोल तपासाकरिता पुन्हा पोलिस कोठडी द्यावी, असा अर्ज पोलिसांनी सत्र न्यायालयात केला होता. तो मंजूरही झाला. मात्र, या आरोपींच्या पोलिस कोठडीसाठी पोलिसांना पुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर युक्तिवाद करणे क्रमप्राप्त होते. 
 
बुधवारी दुपारी या पाच आरोपींना फौजदार नागवे यांनी न्यायालयात हजर केले. मात्र, पोलिस कोठडीसाठी युक्तिवाद करताना त्यांना प्रबळ कारणच देता आले नाही. त्यांच्या युक्तिवादात एकाही नव्या मुद्याचा समावेश नव्हता. न्यायालयाने त्यांना सरकारी वकिलांना नवीन प्रबळ मुद्यांवर युक्तिवाद करण्यासाठी पुरेसा वेळही दिला. मात्र, तरीही पोलिसांना युक्तिवाद करणे जमले नाही. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांनी या पाचही आरोपींना पुन्हा न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. 
 
याच गुन्ह्यातील आरोपी अजित सेवानी, याकूब शेख यांना मात्र १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. बनावट दारुनिर्मिती करण्याच्या कामात मदत केल्याप्रकरणी नवनाथ धाडगे यालाही पाेलिसांनी आरोपी केले. त्यालाही १३ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. एस्टीममधून आरोपींनी दारू वितरित केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींनी कोठे दारू वितरित केली, याचा तपास करावा लागणार आहे. याकूबच्या डायरीतील संशयितांचीही चौकशी होणार आहे. 
 
तपासी अधिकारी गैरहजर  
पांगरमल दारुकांडाचा तपास नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्याकडे आहे. आरोपींचे अटकसत्र सुरू झाल्यापासून ते न्यायालयात आरोपींना घेऊन स्वत: युक्तिवाद करत होते. मात्र, अलीकडच्या दोन-तीन रिमांडला ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे फौजदार नागवे हे आरोपींना रिमांडसाठी न्यायालयात आणतात. युक्तिवादही तेच करतात. त्यामुळेच पाच आरोपींच्या युक्तिवादात पोलिसांची बाजू कमी पडली, असे म्हटले जात आहे. 
 
आरोपींना वर्ग करणार 
नेवासे तालुक्यातही बनावट दारूचे लोण पोहोचले आहे. तरवडी गावात बनावट दारूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात जितू गंभीर, जाकीर शेख, मोहन दुगल इतर आरोपींची नावेही आली आहेत. त्यामुळे त्यांना आता नेवाशाच्या गुन्ह्यात वर्ग केले जाईल. पांगरमल दारुकांडात त्यांना पुन्हा पोलिस कोठडी मिळाली असती, तर तपासाला आणखी गती मिळाली असती. मात्र, तसे झाल्यामुळे पांगरमल दारुकांडाचा तपास पुन्हा खडतर झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...