आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारूकांड: आरोग्य विभागाकडून ‘सिव्हिल’ची झाडाझडती, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे घेतले जबाब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चर्चा करताना आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. पवार. - Divya Marathi
चर्चा करताना आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. पवार.
नगर- विषारी दारूमुळे बळी गेलेल्या पांगरमल दारूकांडाने राज्यभर खळबळ उडाली आहे. ज्या विषारी दारूने सातजणांचे बळी घेतले, त्या दारूच्या निर्मितीचे केंद्र जिल्हा रुग्णालयाच्या कँटीमध्ये असल्याचे उघड झाले. त्यामुळे खडबडून जागी झालेल्या राज्याच्या अारोग्य विभागाने सिव्हिलच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली. या समितीने शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती घेतली. येत्या आठ दिवसांत रुग्णालयातील संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. बी. डी. पवार यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली. 
 
जिल्हा रुग्णालयातील ज्या कँटीनमधून गोरगरीब रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना अल्पदरात चहा, नाष्टा जेवण मिळायला हवे, त्याच कँटीनमध्ये विषारी दारू तयार करण्याचे केंद्र राजरोसपणे सुरू होता. नगर तालुक्यातील पांगरमल येथील सातजणांचा याच विषारी दारूने बळी घेतला. जिल्ह्यासह राज्यभरात या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली. एरवी जिल्हा रुग्णालयातील घोटाळे, रुग्णांची पिळवणूक, वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनमानीकडे कानाडोळा करणाऱ्या राज्याच्या आरोग्य विभागाला या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी लागली. त्यामुळेच सहसंचालक डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. एल. आर. घोडके महेश बोठले अशी त्रिसदस्यीय समितीची चौकशीसाठी नेमणूक केली. या समितीने शुक्रवारी सकाळी रुग्णालयात येऊन झाडाझडती घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांचे जबाब समितीने नोंदवून घेतले. ओपीडी, जनरल वॉर्ड, अतिदक्षता विभाग, पार्किंग, तसेच रुग्णालय परिसराची समितीने पाहणी केली.रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज, हजेरीपत्रक यासह इतर कागदपत्रांची समितीने तपासणी केली. रुग्णालयातील गैरप्रकाराबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून तो राज्याच्या आरोग्य विभागाकडे सादर करण्यात येईल, तसेच संबंधित दोषींवर येत्या आठ दिवसांत कारवाई होईल यादृष्टीने समिती प्रयत्न करेल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. पवार यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना दिली. दरम्यान, समितीने अचानक घेतलेल्या झाडाडतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सोनवणे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. 
 
कँटीन पार्किंगचे पैसे गेले कुठे? 
पार्किंग कँटीनसाठी निविदा मागवताच त्यांचे वाटप मर्जीतल्या व्यक्तींना करण्यात आले. यातून रुग्णालयाला एक रुपयादेखील मिळालेला नाही. हे पैसे गेले कुठे? यासंदर्भात डॉ. पवार यांना विचारले असता ते म्हणाले, इतर सर्वच बाबींची चौकशी होणार आहे. त्यात गैरव्यवहार असेल, तर संबंधितांवर कारवाई होणार, हे निश्चित. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, सरकारी रुग्णालयात दारू ही शरमेची बाब...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...