आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारुकांड: तरवडीच्या बिबन सय्यदचा मृत्यूही बनावट दारुमुळेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तरवडी (ता. नेवासे) येथील बिबन इब्राहिम सय्यद (वय ३२) या तरूणाचा मृत्यू नगरच्या बनावट दारुमुळेच झाल्याचे निष्पन्न झाले. नेवासे पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली. पांगरमल दारुकांडात अडकलेल्या आरोपींनीच नेवाशातही बनावट दारु वितरीत केली होती. बिबनच्या मृत्यूप्रकरणी आता नेवाशातही गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान, पांगरमल दारुकांडातील आरोपींविरुद्ध शनिवारी मोकाचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. 
 
तरवडी येथे बुधवारी सकाळी बिबन सय्यदचा मृत्यू झाला. शवविच्छेदन केल्यानंतर व्हिसेरा पोलिसांनी राखून ठेवला. त्याचा अहवाल आला असून त्याचा मृत्यूही बनावट दारुमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले. नेवासे पोलिसांनी बुधवारी दुपारीच याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले होते. भेंडे शिवारात असलेल्या एका हॉटेलमधून त्यांनी दारु घेतल्याचे समजले होते. पोलिसांनी या हॉटेलला सील ठोकले. तेथेही नगरच्या सोनू दुगलनेच बनावट दारु पुरवली असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. 
 
मद्यसेवन केल्यामुळे पांगरमल येथे नागरिकांचे बळी गेल्यानंतर बनावट दारुनिर्मितीचे रॅकेट उजेडात आले. या रॅकेटची व्याप्ती राज्यभर पसरली आहे. पोलिस उपअधीक्षक तथा तपासी अधिकारी आनंद भोईटे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या १६ झाली आहे. त्यापैकी तेराजणांना अटक झाली असून अद्याप तीन आरोपी फरार आहेत. तेरापैकी आता केवळ एकच आरोपी पोलिस पोलिस कोठडीत आहे. उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. 
 
१४ फेब्रुवारीला बबन आव्हाड (पांगरमल) यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे, भाग्यश्री मोकाटे, मंगल महादेव आव्हाड, महादेव आव्हाड, शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख भीमराज आव्हाड रावसाहेब आव्हाड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध इतर कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला. सुरुवातीला भीमराज आव्हाडला अटक झाली. त्याच्या माहितीवरुन पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील कँटीनमध्ये सुरू असलेल्या बनावट दारुनिर्मितीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. 
 
बनावट दारुनिर्मितीप्रकरणी जितू गंभीर, जाकीर शेख हमीद शेख यांना अटक झाली. नंतर नांदेडमधून मोहन श्रीराम दुगल, संदीप मोहन दुगल आणि वैभव जयसिंग जाधव यांना अटक झाली. सिव्हिल हडकोत राहणाऱ्या भरत रमेश जोशी, तसेच रावसाहेब आव्हाडलाही अटक झाली. नंतर नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य मंगल आव्हाड, तिचा पती महादेव आव्हाड यांनाही अटक झाली. आरोपींना अल्कोहोलचा पुरवठा करणाऱ्या दादा वाणीलाही पोलिसांनी अटक केली. 
बनावट दारुनिर्मिती करण्यासाठी आरोपींना देशी दारुचा पुरवठा करणारा याकूब शेख हा मात्र फरार आहे. पांगरमल गावात मतदारांसाठी दारुच्या पार्टीचे आयोजन करणारे शिवसेनेचे गोविंद मोकाटे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे हेही फरारच आहेत. पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत. आता नेवाशातही बनावट दारुनिर्मिती करणाऱ्या आराेपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल होणार आहे. त्या गुन्ह्यातही या आरोपींना वर्ग केले जाईल. त्यामुळे आरोपींचा कोठडीतील मुक्काम वाढणार आहे. 
 
कॅँटीन गंभीरकडेच 
जिल्हा रुग्णालयातील साईभूषण कॅँटीनमध्ये बनावट दारुचा कारखाना होता. हे कँटीन मेाहन दुगलच्या नावावर असल्याचे आरोपींच्या वतीने सांगितले जात होते. त्यामुळे पोलिसांनी याबाबत अधिकृत चौकशी केली असता हे कॅँटीन जितू गंभीरच्याच नावावर असल्याचे समोर आले. मुदत संपूनही जिल्हा रुग्णालयाने हे कँटीन दुसऱ्या कोणाला चालवायला दिले नव्हते. गंभीरनेच हे कँटीन पुन्हा चालवायला घेण्यासाठी टेंडर भरले होते. मात्र, तेही अद्याप सीलबंद आहे. 
 
आज मोकाचा प्रस्ताव 
आरोपींनी संघटितरित्या अवैध पद्धतीने बनावट दारु तयार केली. या दारुमुळेच जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १३ हून अधिक जणांचे बळी गेले आहेत. एकट्या पंागरमल गावात नऊहून अधिक जण दगावले. तरवडी येथे एक जण दगावला असून दोघे अत्यवस्थ आहेत. या आरोपींचे नेटवर्क राज्यपातळीवर असल्याचे निष्पन्न झाले अाहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोकाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. शनिवारी तो सादर केला जाईल. 
 
कोणाचीही गय नाही 
पांगरमल दारुकांडप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोग्यास घातक असलेले विषारी पदार्थ निर्माण केल्याचे कलमही त्यात आहे. आरोपींची संख्या १६ झाली आहे. यापैकी कोणाचेही नाव वगळले जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. शिवाय तपासात आणखी कोणाचा सहभाग असल्याचे समोर आल्यास त्यांनाही आरोपी केले जाईल, असे तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी सांगितले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...