आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारूकांड: मिथेनॉल कोठून आणले याचा थांगपत्ता लागेना, आरोपी अाज न्यायालयात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरमध्ये बनावट दारूनिर्मिती करणाऱ्या जितू गंभीर, जाकीर शेख इतर आरोपींना आपण अल्कोहोल पुरवत होतो. मात्र, त्यांनी मिथेनॉल कोठून आणले याबाबत माहिती नाही, असे दादा वाणी पोलिसांना सांगत आहे. त्यामुळे बनावट दारूच्या निर्मितीसाठी लागणारे मिथेनॉल कोठून आले याभोवती पोलिसांचा तपास आता केंद्रित झाला आहे. फरार असलेल्या दोन आरोपींचाही पोलिस कसोशीने शोध घेत आहेत. पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. 
 
बनावट मद्यनिर्मितीच्या रॅकेटमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जितू गंभीर, जाकीर शेख, हमीद शेख, मोहन दुगल, संदीप दुगल, भरत जोशी, याकूब शेख, नन्हे शेवानी आदींची नावे समोर आली. जितू गंभीर, शेख, दुगल, जोशी हे मद्यनिर्मिती करायचे. तर इतर आरोपी त्यांना कच्चा माल पुरवत होते, असे तपासात निष्पन्न झाले. धुळ्याचा कुख्यात मद्यतस्कर दादा वाणी आरोपींना अल्कोहोलचा पुरवठा करत होता. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली. वाणी सध्या पोलिस कोठडीत असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 
 
नगरच्या आरोपींना आपण अल्कोहोल पुरवल्याचे त्याने सांगितले आहे. मात्र आरोपींनी मिथेनॉल कोठून आणले, याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे तो सांगत आहे. या गुन्ह्यातील याकूब शेख नन्हे शेवानी नावाचे आरोपी फरार आहेत. त्यांच्या घरांना कुलपे असल्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. पोलिस चौकशीमध्ये वाणीने नगरसह इतर जिल्ह्यांमध्येही अल्कोहोलचा पुरवठा केल्याची माहिती दिली आहे. यामध्ये मोठ्या शहरांमधील प्रतिष्ठित परमिट रूम्सचाही समावेश आहे. 
 
पांगरमल दारूकांड बनावट दारुमुळेच घडल्याचे स्पष्ट आहे. आतापर्यंत १३ जणांचा बळी गेला आहे. पोलिसांनी १६ जणांना आरोपी केले आहे. चौदा जणांना अटक झालेली आहे. त्यातील दहा जण न्यायालयीन कोठडीत रवाना झाले आहेत. तर चौघे जण सध्या पोलिस कोठडीत आहेत. दोन आरोपी मात्र अद्यापही फरार असून पोलिसांना त्यांचाही शोध घ्यायचा आहे. ते सापडल्यावर अनेक बाबींचा उलगडा होईल. 
 
आरोपी अाज न्यायालयात 
पांगरमल दारूकांड प्रकरणात सध्या चार आरोपी एमआयडीसीच्या पोलिस कोठडीत आहेत. धुळ्याचा कुख्यात मद्यतस्कर दादा वाणी, जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनचालक मोहन दुगल, संदीप दुगल, भरत जोशी हे कोठडीत आहेत. या चौघांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा रिमांडसाठी सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले जाईल. या गुन्ह्यातील इतर आरोपींची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत झालेली असल्यामुळे पोलिसांना तपासात अनेक अडचणी येत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...