आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाकी: पांगरमल दारूकांड तपास आता ‘रामानंद स्टाइल’, तपासी अधिकाऱ्यांना विविध सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यगुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी गेले दोन दिवस पांगरमल येथे घडलेल्या दारूकांडाचा सविस्तर आढावा घेतला. याद्वारे निदर्शनास आलेल्या जिल्हा पोलिस दलाच्या बोटचेप्या भूमिकेवर त्यांनी ताशेरेही अोढले. तसेच सीआयडीच्या तपास पथकाला तपासाची दिशाही समजावून सांगितली. रामानंद यांच्या भेटीमुळे पांगरमल दारुकांड प्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग आला आहे. नगरकरांना ज्ञात असलेल्या रामानंद यांच्या कार्यशैलीनुसार आता या गुन्ह्याचा तपास होणार असल्याचे स्पष्ट आहे. 

दारुमुळे तेरा जणांचा बळी घेणाऱ्या पांगरमल दारुकांड प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आलेला आहे. कोल्हापूर विभागाचे अपर पाेलिस अधीक्षक गणेश मोरे यांचे पथक नगरमध्ये दोन आठवड्यांपूर्वीच दाखल झाले. त्यानंतर प्रथमच या विभागाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी नगरमध्ये दाखल झाले. रामानंद यांची पुणे शहर सहपोलिस आयुक्त पदावरून नुकतीच सीआयडीच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढतीवर बदली झाली. या पदाची सूत्रे स्वीकारताच त्यांनी पांगरमल प्रकरणात लक्ष घातले. 
 
रामानंद हे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात तळ ठोकून होते. या भेटीत शुक्रवारी दुपारी त्यांनी पांगरमल गावात भेट दिली. दारुकांडात बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची त्यांनी विचारपूस केली, तसेच विषारी दारुमुळे अपंगत्व आलेल्या काही व्यक्तींशीही त्यांनी चर्चा केली. या चर्चेतून त्यांनी मूळ घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेतली. पांगरमल दारुकांडाला कारणीभूत असलेली बनावट विषारी दारू जिल्हा रुग्णालयाच्या कँटीनमध्ये तयार होत असल्याचे समजल्यानंतर रामानंद यांनी शुक्रवारी सायंकाळी कँटीनला भेट दिली. 
 
जिल्हा रुग्णालयात सध्या सील ठोकलेल्या अवस्थेत असलेल्या या कँटीनचीही त्यांनी सविस्तर पाहणी केली. या भेटीत त्यांनी कँटीनचे परवाने, जिल्हा रुग्णालयासोबत झालेले कराराची कागदपत्र तपासली. त्यामुळे यातून जिल्हा रुग्णालय प्रशासनही सीआयडीच्या रडारवर येण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. पांगरमल दारुकांडाशी संबंधित असलेल्या विविध घटनास्थळांना भेटी दिल्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात बसून त्यांनी या तपासात समावेश असलेल्या जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेतली. 
 
पोलिस अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत रामानंद यांनी तपासाची अधिक सखोल माहिती घेतली. गुन्ह्याची सर्व कागदपत्रेही त्यांनी पाहिली. त्याबाबत काही शंका उपस्थित करुन सीआयडीच्या तपास पथकाला काही सूचना केल्या. या गुन्ह्याच्या अनुषंगाने लक्षात आलेल्या पोलिस दलाच्या कार्यशैलीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले. येत्या आठवड्यात या गुन्ह्याला ९० दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याचे आव्हान आता सीआयडीसमोर आहे. त्याबद्दलही त्यांनी तपास पथकाला काही सूचना केल्या. 

पांगरमल येथे फेब्रुवारीत दारु पिल्यामुळे नागरिकांचे बळी गेल्यानंतर बनावट दारु निर्मितीचे रॅकेट उजेडात आले. या गुन्ह्यात १९ आरोपींची नावे निष्पन्न झाली. १७ जणांना अटक झाली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. एका आरोपीचा पुणे जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाला. बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या आरोपींवर मोकाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या प्रकरणात एका महिला फौजदारासह पोलिसांचे निलंबन, तर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. 

आणखी गुन्ह्यांची नोंद? 
नगरतालुक्यातील पांगरमल दारुकांडामुळे बनावट विषारी दारुचे रॅकेट उजेडात आले. या दारुमुळे जिल्ह्यातील नेवासे, नगर पारनेर तालुक्यांतील आणखी काही निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. यातील एकूण बळींची संख्या १५ हून अधिक आहे. याप्रकरणी नेवासे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद आहे. नगर तालुक्यातही काही जणांचे विषारी दारुमुळे बळी गेलेे असून तसे वैद्यकीय अहवालही प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता नगर तालुका पोलिस ठाण्यातही अशाच स्वरुपाचा गुन्हा नोंदवला जाण्याची दाट शक्यता आहे. 
 
अधिकाऱ्याची बदली 
पांगरमलप्रकरणाचा सुरुवातीचा तपास नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालला. या गुन्ह्यात त्यांनी आतापर्यंत सुमारे १७ आरोपींना अटक केली. बनावट दारुनिर्मितीच्या रॅकेटचा पर्दाफाशही केला. या रॅकेटमध्ये सहभागी असलेली आंतरराज्य टोळीही त्यांनी गजाआड केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग झाला. कोल्हापूर विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश मोरे यांनी तपासी अधिकारी म्हणून सूत्रे घेतली. मात्र, आता त्यांचीही बदली झाल्यामुळे पुन्हा नवे तपासी अधिकारी येतील. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, कोण आहेत रामानंद?...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...