आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारुकांडप्रकरणी 2,396 पानांचे दोषारोपपत्र, वाचा काय होईल शिक्षा?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यभरात गाजलेल्या पांगरमल (ता. नगर) दारुकांडप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने गुरूवारी दुपारी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. आतापर्यंत एकूण हजार ३९६ पानांचे दोषारोपपत्र तयार झाले आहे. त्यात २० आरोपींविरुद्ध आरोप ठेवण्यात आले आहेत. एकूण १६३ साक्षीदारांची यादीही जोडण्यात आली आहे. सीआयडीने तपासाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आणखी एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले. सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये आरोप ठेवण्यात आले आहेत. 
 
१३ फेब्रुवारी २०१७ रोजी पांगरमल येथे बनावट विषारी दारु प्यायल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला. काही दिवसांत ही संख्या वर गेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी गुन्ह्याचा तपास करुन १७ आरोपींना अटक केली. नंतर जिल्हा रुग्णालयातील कँटीनमध्ये सुरू असलेले बनावट विषारी दारुनिर्मितीचे रॅकेट उजेडात आले. एकूण १९ आरोपींची नावे गुन्ह्यात निष्पन्न झाली. त्यापैकी एकाचा पुणे जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाला, तर दोन आरोपी फरार आहेत. 
 
हे प्रकरण राज्यभर गाजल्यामुळे शासनाने या गुन्ह्याचा तपास सीआयडीच्या विशेष पथकाकडे सोपवला. कोल्हापूर विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश मोरे यांच्या पथकाने १४ एप्रिलला तपासाची सूत्रे स्वीकारली. येत्या १४ मे रोजी गुन्हा नोंदवल्याच्या प्रक्रियेला ९० दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे त्याच्या दोन दिवस आधीच सीआयडीने दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सीआयडीने सुरजितसिंग भगतसिंग गंभीर (तारकपूर, नगर) या आरोपीचे नाव निष्पन्न केले. त्याच्या नावावर जिल्हा रुग्णालयातील साईभूषण कँटीन आहे.
 
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात तयार झालेली बनावट विषारी दारु प्राशन केल्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या पांगरमल गावामध्ये १३ जणांना विषारी दारुमुळे कायमचे अपंगत्व (उदा. अंधत्व, पॅरालिसिस) आले आहे. याप्रकरणी नेवासे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातही स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्येही पांगरमल प्रकरणातील काही आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे भविष्यात या गुन्ह्यांचा तपासही सीआयडीकडे वर्ग होण्याची दाट शक्यता आहे. 
 
हे आहेत आरोपी 
भाग्यश्रीगोविंद मोकाटे (इमामपूर), मंगल महादेव आव्हाड (पांगरमल), गाेविंद खंंडू मोकाटे (इमामपूर), भिमराज गेणू अाव्हाड (पांगरमल), रावसाहेब गेणू आव्हाड (पांगरमल), महादेव किसन आव्हाड (पांगरमल), मोहन श्रीराम दुग्गल (गावडे मळा, यशोदानगर), जगजीतसिंग किशनसिंग गंभीर (सिंधी कॉलनी, तारकपूर), जाकीर कादर शेख (मुकुंदनगर), हमीद अली शेख (तारकपूर), साेनू ऊर्फ संदीप मोहन दुग्गल (गावडे मळा), वैभव ऊर्फ शेखर जयसिंग जाधव (पाइपलाइन रस्ता), भरत रमेश जोशी (सिव्हील हडको), नन्ना ऊर्फ अजित गुलराज सेवानी (तवलेनगर), याकुब शेख युनूस शेख (कल्याण रोड), दादा ऊर्फ प्रवीण भालचंद्र वाणी (धुळे), नवनाथ बबन धाडगे (भिंगार), अमित वासुमन मोतियानी (सावेडी), राजेंद्र बबन बुगे (अटकेपूर्वीच मृत, कल्याण रस्ता), सुरजितसिंग भगतसिंग गंभीर (तारकपूर) 
 
यांनी गमावला जीव 
पोपटरंगनाथ आव्हाड (वय ४०), दिलीप रंगनाथ आव्हाड (४५), राजेंद्र खंडू आंधळे (४५, तिघेही पांगरमल), प्रभाकर शिवाजी पेटारे (४५, दत्ताचे शिंगवे), राजेंद्र भानुदास आव्हाड (४३), सुरेश बाबुराव वाकडे (४५), शहादेव भाऊराव आव्हाड (६०), उद्धव मुरलीधर आव्हाड (३२), भास्कर बन्सी आव्हाड (४५, सर्व पांगरमल). 
 
जखमींची नावे : विनोद ऊर्फ प्रभाकर रामभाऊ शेलार, हिराजी नानाजी वाकडे, नामदेव योहान ठोकळ, बाबासाहेब उत्तम आव्हाड, अंबादास दशरथ आव्हाड, आसाराम निवृत्ती आव्हाड, भगवान किसन आव्हाड, आजिनाथ विठोबा आव्हाड, आजिनाथ पाटीलबा आव्हाड, बाबासाहेब सांत्वन वाकडे, हरिभाऊ ज्ञानदेव आव्हाड, महादेव गंगाराम आव्हाड, रावसाहेब भानुदास आव्हाड (सर्व पांगरमल, ता. नगर). 
 
रुग्णालयाला क्लीन चीट ? 
दारुकांडाला कारणीभूत ठरलेली बनावट विषारी दारु जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील कँटीनमध्ये तयार होत होती. या कँटीनचा जिल्हा रुग्णालयाशी करारनामा सन २०१४ मध्येच संपला होता. त्यानंतर ई-टेंडर निघाले होते. मात्र, दुसऱ्या कोणाशी करार होईपर्यंत कँटीन तुम्हीच चालवावे, असे पत्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिले होते. या पत्राच्या आधारे हे कँटीन तब्बल तीन वर्षे बिनबोभाट चालले. मात्र, बनावट दारुनिर्मिती प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका ठेवत जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या कोणालाही आरोपी केलेले नाही किंवा तशी शक्यताही नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाला क्लीन चिट मिळाल्याची चर्चा आहे. 
 
काय होईल शिक्षा? 
दोषारोपपत्रानुसार आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवध, (भेसळयुक्त) विषारी पदार्थामुळे जिवितास धोका पोहोचवणे, गुन्ह्यात सहभाग असणे यासह मुंबई दारुबंदी कायद्याच्या विविध कलमांन्वये आरोप ठेवले आहेत. यापैकी सदोष मनुष्यवध, तसेच विषारी पदार्थाद्वारे अपाय करणे हे आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना आर्थिक दंडासह जन्मठेप किंवा दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. दोषारोपपत्र सादर झाले असले, तरी सीआरपीसी कलम १७३ नुसार सीआयडीचा पुढील तपास सुरूच राहणार आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...