आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल: एसआयटीमार्फत चौकशी करा, राधाकृष्ण विखेंची मागणी, पालकमंत्री राम शिंदेंनीही दिली भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बनावट दारूमुळे अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, राज्य उत्पादन शुल्क स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनाही सहआरोपी करा, घटनेची व्याप्ती लक्षात घेऊन राज्यातील बनावट दारूच्या रॅकेटची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. त्यांनी मंगळवारी दुपारी पांगरमल (ता. नगर) येथे भेट देऊन दारुकांडात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. दुपारी पालकमंत्री राम शिंदे यांनीही पांगरमलला भेट देऊन ग्रामस्थ बळींच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. 

दारुकांड होऊन दहा दिवस उलटले आहेत, तरीही शासनाला, मंत्र्यांना येथे येण्यास वेळ मिळू नये, याबद्दल विखे यांनी खेद व्यक्त केला. यावरुन सरकार असंवेदनशील असल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री पालकमंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून घटनेची गांभीर्य जाणून घेऊ शकले असते. अधिकारी कर्मचाऱ्यांना सरकार पाठीशी घालत अाहेत, असा आरोप विखे यांनी केला. 

बनावट दारू विक्री होत असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभाग स्थानिक पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांचा हलगर्जीपणाच या दारुकांडला कारणीभूत ठरला. सरकारी रुग्णालयाच्या आवारातील कँटीनमध्ये हा प्रकार घडत होता. मग वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल विखे यांनी उपस्थित केला. बनावट दारूमुळे यापूर्वीही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही बळी गेले असतील. त्यादृष्टीने चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले. राज्यात यापूर्वी बनावट दारूमुळे शंभराहून अधिक बळी गेले. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी तेथे भेट दिली नव्हती. राजधानी मुंबईत रूग्णांना दाखल केले, तिथे उपचाराची साधने उपलब्ध नव्हती. पैशांअभावी रूग्ण दगावत असतील, तर शासकीय व्यवस्थेचे अपयश दिसून येते, असे विखे म्हणाले. यावेळी सरपंच बापूसाहेब आव्हाड, मोहन पालवे, बाळासाहेब हराळ, संपत म्हस्के, दादासाहेब घोरपडे, काशिनाथ लवांडे उपस्थित होते. 

आचारसंहितेनंतर निर्णय 
घटना दुर्दैवी असल्याचे पालकमंत्री शिंदे म्हणाले. मृतांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्याची मागणीबाबत आचारसंहिता असल्यामुळे निर्णय घेता येत नाही. आचारसंहिता संपताच विचार केला जाईल. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली जात आहे. त्यांच्याविरुद्ध ‘मोका’चा प्रस्ताव तयार केला जाईल, कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले.
 
पालकमंत्री एकटेच आले 
दुर्घटनेला आठवडा उलटूनही पालकमंत्री शिंदे गावात फिरकले नसल्याचा आरोप सरपंचांनी केला होता. मंगळवारी मंत्री शिंदे गावात आले, तेव्हा त्यांच्याबरोबर भाजपचे कोणीही वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी नव्हते. पांगरमल गाव खासदार दिलीप गांधी यांच्या मतदारसंघात येते. तेही अद्याप गावात फिरकले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी बोलताना केला. 

संपूर्ण दारुबंदी करावी 
दारु राज्यातून हद्दपार करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. त्याला अापला पाठिंबा आहे, असे विखे म्हणाले. दारूबंदी केवळ एका चंद्रपूर जिल्ह्यातच का? संपूर्ण राज्यातच दारुबंदी करा, अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले. आगामी विधानसभा अधिवेशनात आपण दारुबंदीचा ठराव मांडू, अशी ग्वाहीदेखील विखे यांनी यावेळी दिली. 

आज सायंकाळपर्यंत निलंबन 
जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी मंगळवारी दुपारी पांगरमल गावाला भेट दिली. तेथील ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांनी दारुकांडाची माहिती जाणून घेतली. ग्रामस्थांनी त्यांच्यासमोरही शासकीय मदतीची, आरोपींना फाशी देण्याची, सखोल तपासाची, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली. बनावट दारुउत्पादनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन होईल. बुधवारी सायंकाळपर्यंत तसा आदेश निघेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...