आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांवरील हल्ला प्रकरण: संपूर्ण गावाला वेठीस धरू नका; विखे यांची पोलिसांना सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- कुरण येथे निर्माण झालेली परिस्थिती सामंजस्य आणि संवादानेच पूर्वपदावर येऊ शकते. घडलेल्या घटनेचा चौकशी अहवाल उपअधीक्षकांकडून समोर आल्यानंतर घटनेतील सत्यता स्पष्ट होईल. पण ठरावीक गुन्हेगारांसाठी गावाला वेठीस धरता घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी. ग्रामस्थांवर अन्याय झाल्यास मी स्वत: पोलिस प्रशासनाच्या विरोधात सरकारकडे न्याय मागण्यासाठी तुमच्या बरोबर असेल, अशी ग्वाही राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी ग्रामस्थांना दिली.
 
संगमनेरनजीक असलेल्या कुरण येथे कारवाईसाठी गेलेल्या पोलिस निरीक्षक गोविंद आेमासे आणि त्यांच्या पथकावर ग्रामस्थांकडून प्राणघातक हल्ल्याची घटना १९ मे रोजी घडली होती. त्या घटनेनंतर गावात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विखे यांनी कुरण येथे येत ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, उपाधीक्षक अजय देवरे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार रावसाहेब सोनवणे या अधिकाऱ्यांसह भास्कर दिघे, सुदाम सानप, शरद थोरात, डॉ. सोमनाथ कानवडे, शंकर वाळे, शौकत जहागीरदार, अजिज शेख, शरीफ शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने विखे यांना घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर निवेदन देण्यात आले. यामध्ये पोलिस निरीक्षक ओमासे यांना निलंबित करावे, कुरण घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी, ग्रामस्थांना धमकावल्याप्रकरणी ओमासे यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि विनाकारण ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. 

ग्रामस्थांच्या वतीने सुदाम सानप यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस अधिकाऱ्यांकडून झालेल्या त्रासाच्या तक्रारी विखे यांना सांगितल्या. पोलिस अधिकारी गावात येऊन लोकांना विनाकारण अटक करत आहेत. त्यांच्या या दहशतीमुळे लोक गावाबाहेर निघून गेल्याचे स्पष्ट केले. विखे यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांनाही विचारणा केली. पोलिसांना झालेल्या मारहाणीचे कोणीही समर्थन करणार नाही. पण दोषी असलेल्यांवर जरूर कारवाई करावी, संपूर्ण गावाला वेठीस धरू नका, अशा सूचना विखे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या. घटनेची चौकशी पोलिस उपअधीक्षक करीत आहेत. त्यांच्या चौकशी अहवालातून घटनेची खरी सत्यता स्पष्ट होईलच. 

बैठकीनंतर विखेंचा माध्यमांशी बोलण्यास नकार 
दरम्यान,राधाकृष्ण विखे यांनी कुरण घटनेच्या पार्श्वभूमीवर अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, उपअधीक्षक अजय देवरे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे आणि तहसीलदार साहेबराव सोनवणे या अधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात घेतली. बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलतो, असे सांगणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी बंद खोलीतील अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर मात्र माध्यमांसोबत बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या बंद खोलीत नेमकी काय चर्चा झाली. याचा तपशील मिळू शकला नाही. 
बातम्या आणखी आहेत...