आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एसपीं'नी पुन्हा फिरवली भाकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर/ संगमनेर- तात्पुरत्या नेमणुकीच्या नावाखाली पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी तब्बल १९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. दोन महिने उलटत नाही तोच आता पुन्हा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश निघाला आहे. रिक्तपद, विनंतीवरुन, नव्याने हजर झाल्याचे कारण दाखवत या बदल्या झाल्या आहेत. पण याचा फटका काही चांगल्या अधिकाऱ्यांनाही बसला आहे. याची पोलिस वर्तुळात 'ऑफ रेकॉर्ड' उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
कोपरगाव शहर ठाण्याचे निरीक्षक शरद जांभळे यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तेथे नेवासे ठाण्याचे निरीक्षक सुरेश शिंदे यांना नियुक्ती दिली आहे. जिल्हा विशेष शाखेतील निरीक्षक गोकुळ औताडे यांच्याकडे संगमनेर तालुका ठाण्याचा पदभार सोपवला आहे. संगमनेर शहर ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार चव्हाण यांची विनंतीवरुन जिल्हा विशेष शाखेत बदली केली आहे.

तर निरीक्षक गोविंद ओमासे यांच्यावर संगमनेर शहर ठाण्याचा पदभार सोपवला आहे. निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या बदलीमुळे रिक्त पदावर बेलवंडी ठाण्याचे निरीक्षक अनिल लंभाते यांची बदली झाली आहे. श्रीगोंद्याचे सहायक निरीक्षक सचिन वांगडे यांच्याकडे बेलवंडी ठाण्याचा प्रभारी पदभार आला आहे.
बेलवंडीचे सहायक निरीक्षक अरविंद भोळे यांची श्रीरामपूर शहर ठाण्यात बदली झाली आहे, तर नियंत्रण कक्षात नव्याने आलेले उपनिरीक्षक बलभीम गुंजाळ यांना बेलवंडी ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे. तात्पुरत्या का होईना, पण दोन महिन्यांतच पुन्हा बदल्या झाल्यामुळे काहीजण आश्चर्यचकित झाले आहेत.
संगमनेर शहर पोलिस ठाण्याचा कार्यभार निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकडे होता. त्यांनी सुरुवातीपासुन चांगला दबदबा निर्माण केला. गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतर चव्हाण यांनी शहरातील बेकायदा कत्तलखान्यांवर वारंवार छापे टाकत कारवाई केली. चव्हाण यांनी कत्तलखान्यांतून तब्बल २१२ जनावरांची सुटका केली. ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई ठरली. तेव्हापासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या चव्हाण यांनी शहरातील अवैध धंदे, गुन्हेगारीवर अंकुश आणला.
निरीक्षक नितीन चव्हाण यांचे कौतुक खुपले की काय?
संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कामगिरीचा आलेख उंचावत होता, तर दुसरीकडे त्यांच्याविषयी वरिष्ठांकडे तक्रारी वाढल्या होत्या. काही दिवसांपासून त्यांना टीकेचा सामना करावा लागत होता. गेल्या महिन्यात मुंबईच्या वृत्तपत्र लेखक संघटनेने त्यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर केला. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्या अभिनंदनाचे शुभेच्छाफलक शहरात लागले होते. हेही काही संघटनांच्या रोषाचे कारण ठरले. त्यांची बदली विनंतीवरुन केल्याचे आदेशात नमूद केले असले, तरी या बदलीमागे विविध कारणे असल्याची चर्चा पोलिसांच्या वर्तुळात रंगली आहे.