आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण: जगतापांंच्या तीन पिढ्यांचा आमच्यामुळेच मिटला प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - राजकारणात आम्ही अनेकवेळा कुंडलिकराव जगताप यांना मदत केली, याची त्यांनी जाणीव ठेवावी. आम्ही साथ दिली नसती, तर जगताप कुटुंब आज कोठे असते? आमच्या पिढ्या काढणाऱ्या जगतापांच्या तीन पिढ्यांचा प्रश्न आमच्यामुळेच मिटला, असे प्रत्युत्तर साईकृपा उद्योग समूहाचे प्रमुख सदाशिव पाचपुते यांनी गुरूवारी दिले. 
 
जगताप यांनी पाचपुते कुटुंबावर बुधवारी जि. प. पं. स. निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत जोरदार टीका केली. तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न आमदार राहुल जगताप मार्गी लावत आहेत. रस्त्यांची दर्जेदार कामे चालू आहेत. पाचपुतेंच्या कार्यकाळात पुढे रस्ता व्हायचा आणि मागे खड्डे पडायचे. भाजप सरकारच्या जीवावर दहशतीची भाषा करणाऱ्या पाचपुतेंचे स्वतःच्या घरातच काही चालत नाही, असा आरोप त्यांनी केला होता. 
 
या टीकेचे जोरदार पडसाद उमटले. जगताप एकदम आक्रमक झाल्याची चर्चा सुरू झाली. या टीकेला माजी मंत्री बबनराव पाचपुते याचे बंधू सदाशिव यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘कृतघ्नपणा हा जगताप यांचा विशेष गुण आहे. बबनरावांच्या मदतीमुळेच ते पंचायत समितीचे सभापती झालेे. सभापतिपदाच्या काळात त्यांची आर्थिक पायाभरणी झाले. पुढेही अनेक संकटांत त्यांना आम्हीच मदत केली. आमचे सहकार्य नसते, तर कुकडी कारखाना उभा राहिला नसता. आमच्यामुळे तुमच्या तीन पिढ्यांचा प्रश्न मिटला अन्तुम्ही आमच्या पिढ्या काढता.” 
सभेत बोलताना जगताप यांनी पाचपुते यांना उसाच्या काट्यावर काम देतो, असे आव्हान दिले होते. त्याला उत्तर देताना पाचपुते म्हणाले, “बेणे, जमीन, पाणी मशागत तालुक्यात एकसारखीच असताना कुकडी कारखान्याचा साखर उतारा जिल्ह्यात सर्वाधिक कसा, हा प्रश्न आम्ही नव्हे तर जगताप ज्यांच्यासोबत आज फिरत आहेत, त्या सहकार महर्षींनीच पहिल्यांदा उपस्थित केला होता. त्याचे उत्तर त्यांनी आधी दिले पाहिजे.” 

तालुक्यातील दुष्काळी स्थितीचा उल्लेख करीत पाचपुते म्हणाले, ‘“दुष्काळात आमदार महाशय कोठे होते? जनता पाण्यासाठी तळमळत होती. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न होता. शेतीला पाणी नव्हते. यांना छावण्या उभारता आल्या नाहीत. टँकरची व्यवस्था करू शकले नाही. आम्हाला टँकर मोजायला ठेवले होते का, असे म्हणणारे दौंड-नगर मार्गाच्या खड्ड्यांवर मोजमाप घेत होते. यांची नेमणूक खड्डे मोजण्यासाठी झाली होती का? आमदार हा जनतेचा उत्तरदायी असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत त्यांना जाब विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. इतरांच्या उणिवा दाखविल्याने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध होईल का?” 
 
विरोधकांच्या ऐक्याविषयी बोलताना पाचपुते म्हणाले, ‘“सत्तेसाठी एकत्र आलेली स्वार्थी लोकांची ही टोळी आहे. एकाला पाचपुते कुटुंबाची धास्ती वाटते, तर दुसऱ्याला २०१९ च्या विधानसभेची तयारी करायची आहे. जनतेसाठी यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नाही. संधीसाधूंचा हा मेळा आहे. स्वार्थ संपला की हा मेळा विसर्जित होईल. जनता हा कावा ओळखून आहे. 
 
“आम्हाला कुकडीच्या काट्यावर काम देऊ म्हणणारे जगताप यांना रॉकेलच्या दुचाकी वरून चारचाकीत बसवण्याचे श्रेय आमचे आहे, याचा त्यांना विसर पडला. त्यांना पहिली मोटार घेण्यासाठी वर्गणी आमची होती. जिल्हा बँक निवडणुकीत जगताप यांच्यासाठी थंडीत आम्ही मतदार सांभाळले, त्यावेळी जगताप साखर झोप घेत होते,” असे ते म्हणाले. 
 
‘पाचपुते हटाव’चा बदला घेण्याची वेळ 
- विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी गोबेल्स तंत्राप्रमाणे माझ्या विरोधात प्रचार केला. ‘पाचपुते हटाव’ हाच विरोधकांचा मंत्र होता. मला हटवल्याने तालुक्याचे किती नुकसान झाले हे आता जनतेला उमगले आहे. विधानसभा निवडणुकीतील अपयशाचा बदला घेण्याची वेळ आली आहे. निवडणूक निकालानंतर ते दिसेलच. सहकारी कारखानदार ऊस नेण्यात पक्षपात करत होते म्हणून आम्ही कारखाने काढले. शिक्षण संस्था काढली. जनतेसाठी आम्ही अडचणीत आलो. कारखान्याऐवजी शहरात अन्य उद्योग धंदे करता आले असते. आम्ही तसे केले नाही. बबनराव पाचपुते, माजी मंत्री. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...