आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राळेगणसिद्धीत उभारणार ८ कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प, रोज १ मे.वॅ. वीजनिर्मिती शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी (ता. पारनेर) गावात सिंचनासाठी स्वतंत्र सौरऊर्जा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पातून दररोज एक मेगावॅट वीजनिर्मिती होईल. सिंचनासाठी आवश्यक गरज भागवून उरलेल्या विजेची विक्री केली जाईल. ग्रामपंचायत राबवत असलेला हा देशातील पहिला प्रकल्प असल्याचा दावा उपसरपंच लाभेश आैटी यांनी केला.

राळेगणसिद्धी गावात राबवण्यात आलेल्या पुनर्भरण प्रकल्पांतर्गत कुकडी कालव्याचे पाणी ६५० अश्वशक्तीच्या विद्युतपंपाने टेकडीवर नेले जाते. तेथून ते शेतीला पुरवले जाते. या माध्यमातून परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. ही योजना चालवण्यासाठी वर्षाकाठी १५ ते २० लाख रुपये वीजबिल येते. वसुलीत अडचणी येत असल्याने ही योजना शासनाकडे द्यावी, असा विचार पुढे आला. तथापि, हा प्रकल्प सौरऊर्जेवर चालवल्यास वीजबिलापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळेल, अशी कल्पना अण्णांनी मांडली. तसा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. “मेडा’कडे (महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी) हा प्रस्ताव सादर करण्यात आला. कालव्यावर प्रकल्प उभारल्यास जमिनीसाठी वेगळी गुंतवणूक करावी लागणार नाही, असा विचार पुढे आला. केंद्राच्या धोरणानुसार या प्रकल्पाला ३० टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. उर्वरित निधी १४ वा वित्त आयोग, जिल्हा नियोजन, आमदार व खासदार निधी, तसेच विविध कंपन्यांच्या सीएसआरमधून उपलब्ध होऊ शकतो. या प्रकल्पाला “मेडा’ची तत्त्वत: मान्यता मिळाली आहे, तसेच पाटबंधारे विभागानेही हिरवा कंदील दाखवला आहे.

हा प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर तो ग्रामपंचायत मालकीचा होईल. निर्माण होणारी अतिरिक्त वीज “महाजनको’ला विकण्याचेही नियोजन आहे. या प्रकल्पामुळे महावितरणाच्या बिलापासून सुटका तर होईलच, त्याबरोबर उत्पन्नाचे नवीन स्रोतही उपलब्ध होतील.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...