आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारूकांड: शेख, गंभीरच्या कोठडीत वाढ, गावात रास्ता रोको आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पांढरीपूल येथे सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. - Divya Marathi
पांढरीपूल येथे सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
नगर - पांगरमल येथील दारूकांडात अटकेत असलेल्या तीन आरोपींच्या पोलिस कोठडीत २२ फेब्रुवारीपर्यंत वाढ झाली. जाकीर शेख, जितू गंभीर हमीद शेख यांची कोठडी वाढली. सुरुवातीला अटक केलेल्या शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख भीमराज आव्हाड रावसाहेब आव्हाड यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांनी सोमवारी हे आदेश दिले आहेत. 
 
या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे. भीमराज आव्हाड याला पहिल्याच दिवशी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या कबुलीनंतर जितू गंभीर, जाकीर शेख यांना अटक करण्यात आली. नंतर मोहन दुगल, संदीप दुगल, वैभव जाधव, भरत जोशी यांना अटक करण्यात आली. यापैकी मोहन दुगल, संदीप दुगल, वैभव जाधव, भरत जोशी यांना २२ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. रुग्णालयातून डिसचार्ज मिळताच रावसाहेबलाही अटक झाली. 

सोमवारी भीमराज आव्हाड, जितू गंभीर, जाकीर शेख हमीद शेख यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्यांच्यासह रावसाहेब आव्हाड यालाही पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले. गुन्ह्याच्या अधिक सखोल तपासाकरिता आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती तपासी अधिकारी आनंद भोईटे सरकारी वकिलांनी केली. मात्र, आरोपींच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने दोघांचीच कोठडी वाढवली. 

दरम्यान, विविध मागण्यांसाठी पांगरमलच्या ग्रामस्थांनी सोमवारी पांढरीपूल येथे सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत द्यावी, फरार आरोपींना त्वरीत अटक करावी, तपास सीबीआयकडे सोपवावा यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह काही स्थानिक नेते नंतर आंदोलनात सहभागी झाले. यावेळी पांगरमलचे सरपंच बापूसाहेब आव्हाड, उपसरपंच देविदास आव्हाड, बाजार समितीचे संचालक बबन आव्हाड, अमोल आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह मोठा फौजफाटा यावेळी तैनात होता. 

बळी गेलेल्या कुटुंबियांना शासकीय मदत द्यावी, फरार आरोपींना अटक करावी, तपास सीबीआयकडे सोपवावा, या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या प्रकरणात अडकलेल्या राजकीय आरोपींवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
 
आणखी एक अत्यवस्थ 
पालेवाडी (ता. पाथर्डी) येथे बनावट दारूसेवनाने बेशुद्ध झालेल्या एकाला सोमवारी सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. संदीप सुराणा यांनी त्याची तपासणी केली. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार चालू आहेत. पांगरमल येथील रुग्णांप्रमाणेच त्याची अवस्थाही चिंताजनक असल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. 
 
पालकमंत्र्यांचा आम्हाला साधा फोनही आला नाही..
- दुर्घटना घडूनआठ दिवस उलटले. मात्र, पालकमंत्र्यांना आतापर्यंत या गावात यावेसे वाटले नाही. त्यांनी साधा फोन करुन चौकशीही केलेली नाही. ते सांत्वन करण्यासाठी आलेे नाहीत. गावावर पसरलेल्या शोककळेमुळे आम्हाला रस्त्यावर यावे लागले आहे. या गुन्ह्याचा तपास सीबीआयमार्फत करुन या खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी आहे.
-बापूसाहेब आव्हाड, सरपंच,पांगरमल 

युवकाविरुद्ध कारवाई 
आरोपींना न्यायालयात आणले, त्यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती. कामकाज सुरू असताना नवनाथ खाडे या युवकाचा मोबाइल खणखणला. भिंगारचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण, भाऊसाहेब आघाव यांनी त्याला ताब्यात घेतले. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी खाडे याच्यावर मुंबई पोलिस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. 

त्यांचे अज्ञान उघड 
पांढरी पूल येथे रास्ता रोको सुरू असताना एका नेत्याने भाषण केले.त्यांनी पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एमआयडीसी पोलिसांच्या कोठडीत असलेल्या आरोपींना त्यांचे नातेवाईक सहज भेटतात, त्यांचे चोचले पुरवले जातात, असा आरोप त्यांनी आपल्या भाषणात केला. पोलिसांनी नंतर तो खोडून काढला. 
 
(Pls Note-  तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...