आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकवर्गणीतून उभारलेल्या स्वागत कमानीमुळे प्रभाग 30 ‘रोल मॉडेल’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुंबई,पुणे शहराच्या धर्तीवर नगर शहरातही भव्य स्वागत कमानी उभ्या राहू लागल्या आहेत. प्रभाग ३० चे नगरसेवक गणेश भोसले यांच्या पुढाकारातून बुरूडगाव रस्त्यावरील साईनगरमधील नागरिकांनी भव्य आकर्षक कमान उभारली आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी साडेतीन लाख रुपयांची वर्गणी गोळा करून या कमानीचा खर्च उचलला. आकर्षक कमानीमुळे प्रभागाची ओळख राेल मॉडेल म्हणून झाली अाहे. 
 
प्रभाग ३० मधील अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. प्रभागात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाली आहे. नागरिकांच्या मदतीने नगरसेवक भोसले यांनी येथील वृक्षसंवर्धन केले. प्रभागातील ही झाडे आता दहा-पंधरा फूट उंच वाढली आहेत. साईनगरमधील रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून रस्त्याच्या मधोमध लावलेली वेगवेगळ्या प्रकारची झाडे मोठी झाली आहेत. त्यामुळे उत्साह वाढलेल्या परिसरातील नागरिकांनी साईनगरमध्ये प्रवेश करताना बुरूडगाव रस्त्यावर आकर्षक स्वागत कमान उभारण्याचा निर्णय घेतला. नगरसेवक भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम अल्पावधीत पूर्णत्वास आला. बुरूडगाव रस्त्यावर सुमारे ४६ फूट रुंद २८ फूट उंचीची ही स्वागत कमान लक्ष वेधून घेते. कमानीवर आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे रात्री या परिसरातून जाताना आपण मुंबई, पुणे शहरात आल्याचा भास होतो. विशेष म्हणजे कमानीसाठी आलेला सुमारे साडेतीन लाखांचा खर्च परिसरातील नागरिकांनी वर्गणी स्वरूपात दिला आहे. प्रभागात आता लवकरच सुमारे दीड कोटी रुपयांचे भव्य उद्यान साकारण्यात येणार आहे. नगरसेवक भोसले प्रभागातील नागरिकांच्या समन्वयातून अनेक विकासकामे, तसेच नवीन संकल्पना प्रत्यक्षात अंमलात येत आहेत. त्यामुळेच या प्रभागाची रोल मॉडेल म्हणून ओळख निर्माण झाली आहे. 
 
बुरुडगाव रस्त्यावरील साईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोकवर्गणीतून उभारण्यात आलेली आकर्षक स्वागत कमान. या कमानीमुळे प्रभागाच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. 
 
इतरांसाठी आदर्शच... 
निधी उपलब्ध होत नसल्याने मनपाच्या नावाने बोंब मारणाऱ्या नगरसेवकांसाठी भोसले यांनी आदर्श उभा केला. केवळ मनपाच नाही, तर लोकसहभागातूनही चांगली कामे करता येतात, हे त्यांनी कमानीच्या माध्यमातून दाखवून दिले. नगरसेवक नागरिकांचे विश्वासाचे नातेदेखील या कमानीच्या निमित्ताने अधोरेखित झाले. शहरातील इतर प्रभागात अशी विकासकामे नवीन संकल्पना राबवल्या, तर शहराचे रुप बदलण्यास वेळ लागणार नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...