आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी जागृती माहितीपट, जीवनाचा पुरेपूर आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी तयार केलेल्या माहितीपटाचे प्रकाशन करताना... - Divya Marathi
गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी तयार केलेल्या माहितीपटाचे प्रकाशन करताना...
नगर - मसक्युलरडिस्ट्रॉफी (स्नायूंची विकृती) या आजारात स्वत:च्या पायावर उभे राहणे अशक्य बनल्याने रुग्णाला चार भिंतींच्या आत बंदिस्त होऊन परावलंबी जीवन जगावे लागते. नगरमधील प्रसाद किरण पंडित याला दुर्दैवाने या आजाराने ग्रासले. परंतु कुटुंबीयांचे पाठबळ आणि मित्रांची साथ यामुळे घरात बसूनही प्रसादने आपल्या शारीरिक दुखण्यातून मार्ग शोधत बुध्दिमत्तेला चालना दिली. आपल्या मित्रांच्या सहकार्याने प्रसादने गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता, जतन संवर्धन याबाबत संदेश देणारा जागृती हा लघुपट बनवला आहे. 
आजारामुळे घराबाहेर पडू शकत नसला, तरी प्रसाद दररोज चिंतन, मनन वाचन करतो. सकारात्मक विचारसरणीतून त्याला ऐतिहासिक वास्तू, शिवरायांचे गडकिल्ले यांची दुरवस्था थांबवण्याची कल्पना सूचली. त्याने जागृती या लघुपटाचे लेखन केले. या लघुपटाबाबत प्रसादने सांगितले, आजकालची तरुण पिढी कोणताही आनंद पार्टी करून साजरा करते. पर्यटनाच्या नावाखाली ऐतिहासिक स्थळांवर धुडगूस घातला जातो. ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात दारूच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रिकामी पाकिटे, तसेच प्लास्टिक कचऱ्याचा ढीग पहायला मिळतो. वास्तूंवर चित्र-विचित्र मजकूर लिहिणे, भिंती रंगवणे असे प्रकार केले जातात. हे थांबवण्यासाठी मित्रांच्या सहकार्याने लघुपट बनवण्याची संकल्पना सूचली. मला घराबाहेर पडता येत नसले, तरी सर्व काही डोक्यात पक्के होते. त्यानुसार मित्रांना सूचना दिल्या. फोनद्वारे सूचना करत लघुपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. मित्रांनी या संकल्पनेला साथ देत उत्तम काम करत आपल्या संकल्पनेला मूर्त रूप दिले. या लघुपटातून ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले यांचे संवर्धन, स्वच्छता ठेवून इतिहासापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रसादच्या या लघुपटासाठी त्याचे वडील आर्टिस्ट किरण पंडित यांनी सहकार्य केले. प्रसादला दुर्धर आजार असला, तरी संपूर्ण कुटुंब त्याला कायम आनंदित ठेवून ऊर्जा देण्याचे काम करते. त्याला मित्रांचीही चांगली साथ मिळते. यातूनच ते जागृतीसारखी चांगली कलाकृती तयार करू शकले, याचा आनंद आहे, असे ते म्हणाले. 
या लघुपटात सचिन चव्हाण, शुभम निर्मल, कृष्णा गालगटे, ऋषी चिंतामणी, मयूर म्हस्के यांनी भूमिका साकारल्या आहेत. फोटोग्राफी, शुटींग एडिटींग अक्षय झिरमिटे याने केले आहे. दिग्दर्शन लेखन प्रसादने केले आहे. या लघुपटासाठी प्रसाद त्याच्या टीमला अनिल वाघ, माजी नगरसेवक नितीन शेलार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

जीवनाचा पुरेपूर आनंद 
इयत्ता दहावीपर्यंत इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच जीवन जगत असताना प्रसाद पंडित याला स्नायूंची विकृती हा दुर्धर आजार झाला. या आजारामुळे परावलंबत्व आले असले, तरी त्याने जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याचा निश्चय करून निराशेला आपल्यापासून दूर ठेवले आहे. जागृती या लघुपटातून त्याने खरोखरच समाज जागृती करण्याचा संदेश दिला आहे. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...