शिर्डी - शिर्डीत मूलभूत सुविधांचा वणवा असताना शासनाने पुन्हा विमानतळासाठी ११० कोटी साईबाबांच्या तिजोरीतून काढण्याचा घाट घातला आहे. अगोदर शिर्डी शहराचा विकास करा, नंतर श्रीमंत भक्तांसाठी पायघड्या घाला, असा आरोप करत विमानतळासाठी पुन्हा साईंच्या झोळीत हात घातल्यास तीव्र विरोध करू, प्रसंगी शिर्डी सलग दोन दिवस बंद ठेवण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर साईसंस्थानकडून जलशिवार योजनेसाठी ३४ कोटी रुपये घेतले. त्यानंतर राज्यातील जिल्हा रुग्णालयातील मशिनरीसाठी ४३ कोटी रुपये मंजूर केले व आता विमानतळासाठी चक्क ११० कोटी रुपये संस्थानकडे मागितले असल्याचे वृत्त असून याबाबत येत्या सोमवारी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीत पाणी, रस्ते, दर्शनरांग, स्वच्छतागृह आदी मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. वर्षानुवर्षे ही कामे रखडली आहेत. सन २००७ पासून साईबाबा संस्थानच्या दोन डझन फाइल शासन दरबारी धुळखात पडलेल्या असताना त्याकडे बघण्यास मागील व विद्यमान सरकारला वेळ नाही. या फाइलल मंजुरी दिली जात नाही अथवा नाकारल्याही जात नसल्याने भिजत घोंगडे पडले आहे. परिणामी शहरातील रस्ते, कचरा, दर्शनरांगा, स्वच्छतागृह, भूमिगत रस्ते, साई गार्डन, लेझर शो आदी विकासात्मक प्रकल्प रखडले आहेत.
न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय त्रिसदस्य समितीला घेता येत नसल्याने साईबाबा संस्थानचे देशभरात नावाजलेले दोन्ही रुग्णालय बंद पडण्याच्या मार्गावर आले आहेत. रक्त तपासणीसाठी साधे केमिकल नाही. डॉक्टर रुग्णालय सोडून जात आहेत. शिर्डीसह परिसरातल रुग्णांना उपचार मिळत नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
तर आंदोलन करणार
शिर्डीच्या विकास कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करत विमानतळासाठी ११० कोटी नेल्यास सलग दोन दिवस शिर्डी बंद ठेवण्याचा इशारा शिर्डीच्या नगराध्यक्ष अनिता जगताप, उपनगराध्यक्ष नीलेश कोते, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शेळके, माजी शहर प्रमुख संजय शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप, मनसेचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय कोते, भाजपचे रवींद्र गोंदकर यांनी देत तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. साईबाबा संस्थानचे पैसे शासनाने घेतल्यास सर्व पक्षियांच्या वतीने तीव्र विरोध करण्याचा इशारा शिर्डी ग्रामस्थांनी दिला.