आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान वयातच मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे - डॉ. अभिजित पाठक यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. अभिजित पाठक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. - Divya Marathi
डॉ. अभिजित पाठक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
नगर- लहान मुलांवर योग्य वयातच चांगले संस्कार झाल्यास ते सुजाण नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीत योगदान देऊ शकतात. सध्याच्या मोबाइल, इंटरनेट संगणकाच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी व्हायला पाहिजे. त्यासाठी पालकांनीही मुलांच्या हातात तंत्रज्ञान देताना त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे.
 
वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास होत असल्याने क्रमिक पुस्तकांबरोबरच अवांतर वाचनासाठी मुलांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अभिजित पाठक यांनी सांगितले. 
 
नगर-जामखेड रस्त्यावरील किंडरस्कूलमध्ये आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पाठक बोलत होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पाठक म्हणाले, किंडर स्कूलने विद्यार्थ्यांना काळानुरूप शिक्षण देण्यावर भर दिला आहे.
 
क्रमिक शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. अशा स्पर्धा, कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहन त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय मोलाचे आहे. 
 
प्राचार्य कविता काणे म्हणाल्या, गेल्या २० वर्षांपासून किंडर किडस् स्कूल कार्यरत आहे. पालकांपासून प्रथमच दूर होत विद्यार्थी शालेय जीवनात प्रवेश करत असताना विशेष लक्ष द्यावे लागते. प्रत्येक मुलाच्या प्रगतीकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते.
 
यातून या चिमुरड्यांशी त्यांचा कल लक्षात घेऊन संवाद साधण्यात येतो. हसतखेळत मनोरंजनात्मक पध्दतीने शिक्षण देण्याची परंपरा किंडर किडस् ने  जपली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यावर प्रशिक्षित शिक्षकांमुळे वैयक्तिक लक्ष देण्यात येते. त्यामुळे विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थी हिरिरीने सहभाग नोंदवून आपल्यातील कलागुण सादर करतात. 
 
किंडर किडस् तर्फे हिंद सेवा मंडळाच्या बागडपट्टी येथील शाळेसाठी १५ हजार रुपयांची खेळणी देण्यात आली. या कार्यक्रमात कथाकथन, प्रश्नमंजूषा, प्रोजेक्ट प्रदर्शन आदी उपक्रम राबवण्यात आले.
 
यूकेजीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. यूकेजी पूर्ण झाल्यानंतर पूर्व प्राथमिक शिक्षणात पदवी मिळवून विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतात. त्यांचा पदवीदान कार्यक्रम प्रत्येक वर्षी शाळेमार्फत घेतला जातो.
 
कथाकथन स्पर्धेत अनन्या देशमुख, गौरी आचार्य, प्रतिलसिंग साहनी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. स्टुडंट ऑफ इयरचे बक्षीस अनन्या देशमुख गौरी आचार्य यांना मिळाले. वर्षभरातील सर्वाधिक उपस्थितीसाठीही विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते. 

 
बातम्या आणखी आहेत...