आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘अध्यात्म’हवे... कार्यक्षमता, करूणा आणि बांधिलकी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीएसआरडी आयएमएस आयोजित परिसंवादाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, डॉ. एन. एम. रसाळ, डॉ. सुरेश पठारे डॉ. एम. बी. मेहता. - Divya Marathi
सीएसआरडी आयएमएस आयोजित परिसंवादाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, डॉ. एन. एम. रसाळ, डॉ. सुरेश पठारे डॉ. एम. बी. मेहता.
नगर- अध्यात्मही संकल्पना कोणत्याही विशिष्ट धर्माशी निगडीत नाही. अध्यात्म हे मानसिक विकासाला मदत करते. चांगले विचार घेणे आणि वाईट विचार निघून जाणे हा अाध्यात्मिकतेचा सोपा अर्थ आहे. आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अध्यात्म या विषयाचा समावेश व्हायला हवा, अशी अपेक्षा अनेक मान्यवरांनी शुक्रवारी व्यक्त केली. 
 
डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या सीएसआरडी आणि आयएमएस संस्थेच्या वतीने कार्यक्षमता, करूणा आणि बांधिलकी या विषयावर आयोजित परिसंवादात देशभरातील विविध संस्थांमधील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. हॉटेल पॅराडाईजच्या सभागृहात होत असलेल्या या दोन दिवसांच्या परिसंवादाचे उदघाटन प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीपीएचई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एन. एम. अॅस्टन होते. 
 
प्राचार्य डॉ. रसाळ यांनी आजची शिक्षण पद्धती आणि अध्यात्म या विषयावर बीज भाषण केले. मनाची जडणघडण करणारी, चारित्र्यवान पिढी घडवणारी, व्यक्तीचा विकास करणारी मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती ही आजची मोठी गरज आहे. त्यासाठी अध्यात्माचा पाया महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी सांगितले. अध्यात्म हे प्राणवायूसारखे आहे. अध्यात्म व्यक्तीला अनैतिकतेकडून नैतिकतेकडे घेऊन जाते. “परमार्थनिष्ठा’ वादाची उद्दिष्ट्ये म्हणजे स्वआदरजपणे, इतरांचा आदर करावयास शिकणे, प्राणिमात्रांचा आदर आणि दृष्टिकोन विकसित करणे होय, असे त्यांनी नमूद केले. 
 
सध्या वाढत असलेला दहशतवाद, तसेच आत्महत्या रोखण्यासाठी, माणसांची मेलेली मने जागी करण्यासाठी अध्यात्मच उपयोगी पडले, असे सांगून डॉ. अॅस्टन म्हणाले, विद्यापीठस्तरावरीय अभ्यासक्रमात अध्यात्माचा समावेश होणे आवश्यक आहे. योगाप्रमाणेच अध्यात्मावर पदवी अभ्यासक्रम सुरू करायला हवा. केवळ मेडिटेशन केले, तरी ताणतणाव नाहिसा होऊन मनशांती आणि समाधानाचा अनुभव घेता येतो, असे त्यांनी नमूद केले. 
 
सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी प्रास्ताविकात परिसंवादाचा उद्देश सांगितला. संस्थेने आतापर्यंत याविषयावर पाच आंतरराष्ट्रीय परिसंवादांचे आयोजन केले असून अध्यात्माची उपयुक्तता याविषयावर विविध तज्ज्ञांनी यावर व्यक्त केलेल्या मतांची नोंद व्यापक प्रमाणात घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. आयएमएसचे संचालक डॉ. एम. बी. मेहता यांनी आभार मानले. प्रा. डॉ. प्रीतम बेदरकर यांनी मान्यवरांची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मोहमंद अरिफ यांनी केले. 
 
उदघाटन समारंभास माजी प्राचार्य खासेराव शितोळे, मुंबईतील टाटा सामाजिक संस्थेचे डॉ. बिपीन जोजो, डॉ. रमेश जारे, मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन मेनाचेरी, डॉ. केशव वाळके, विद्यापीठाचे डॉ. बी. ए. देशमुख, डॉ. आशिष जेम्स, देहरादून येथील डॉ. अनुप हिवाळे, फादर सुरेश साठे, सी. व्ही. नांदेडकर, डॉ. अनिल सहस्रबुद्धे, डॉ. जी. डी.लोंढे, डॉ. उषा लोळगे, जयेश कांबळे, राजेंद्र पवार यांच्यासह अनेक अभ्यासक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
जो जे वांछिल, तो ते लाहो... 
वेदांतीलधर्म, अर्थ, काम, मोक्ष या संकल्पनेचा अर्थ विज्ञान, कौशल्य आणि सात्विक अनुभव असा आज घ्यायला हवा. चांगले विचार घेणे आणि वाईट विचारांचे निघून जाणे हा अध्यात्माचा खरा अर्थ आहे. जी माणसाला समाजाला नैतिकतेकडे घेऊन जाते, ती विचारपद्धती म्हणजे धर्म आहे, असे डॉ. रसाळ यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानेश्वरीतील पसायदान झाले. या वैश्विक प्रार्थनेतील जो जे वांछिल, तो ते लाहोचा उल्लेख करत चांगल्या विचारांची पुन्हा पुन्हा आळवणी म्हणजेच प्रार्थना असल्याचे स्पष्ट केले. 
बातम्या आणखी आहेत...