आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्णाकृती शिवपुतळा बसवण्यात तांत्रिक अडचणी, नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात तांत्रिक अडचणी आहेत. राज्यमार्गावर अशा स्मारकास परवानगी मिळणे अशक्य असल्याने या राज्यमार्गाचा दर्जा कमी करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी बुधवारी सांगितले. 
 
नगराध्यक्ष आदिक यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र पवार, उपअभियंता प्रकाश उजागरे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र रोकडे यांनी शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी मागणी असलेल्या जागेची पाहणी केली. यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, संतोष कांबळे, प्रकाश ढोकणे, सिद्धार्थ मुरकुटे आदींसह स्मारक समितीचे नागेश सावंत, अरूण पाटील, शिवसेनेचे सचिन बडदे, तिलक डुंगरवाल, दीपक दुग्गड, अहमद जहागीरदार, संदीप मगर, सुभाष त्रिभुवन, राजेंद्र पठाडे, अशोक थोरे, राजेंद्र भोसले, सागर भागवत, विकास डेंगळे , केतन खोरे आदी उपस्थित होते. 
 
जागेच्या पाहणीनंतर नगरपालिका सभागृहात बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्ष आदिक म्हणाल्या, यापूर्वी शहरातील दारूची दुकाने सुरू होण्यासाठी रस्ता हस्तांतरणासाठी माझ्यावर अनेकांनी दबाव आणला होता. मात्र, सामाजिक हित पाहून त्यास आपण विरोध केला. छत्रपतींचा पुतळा शिवाजी चौकात उभारण्याचे आश्वासन आपण निवडणुकीदरम्यान दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मी आता पुढाकार घेत आहे. दारूची दुकाने सुरू करण्यासाठी रस्ता हस्तांतरणास विरोध केला. मात्र, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी राज्य महामार्गाचा दर्जा कमी करण्यासाठी प्रस्ताव सादर करणार आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत पुतळा बसण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. 
 
कार्यकारी अभियंता पवार म्हणाले, दहा वर्षांपूर्वी पालिकेच्या सभेत राज्यमार्ग हस्तांतरणाचा ठराव करण्यात आला होता. मात्र, दर्जा कमी करण्याचा प्रस्ताव दिला नसल्याने हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले असून पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. बैठकीत नगरसेवक पवार, ढोकणे, मुरकुटे, बडदे, त्रिभुवन आदींनी मते मांडली. 
 
दरम्यान, यापुढे नव्याने जिथे जिथे पुतळे उभारले जाणार आहेत, तिथे हाच प्रश्न उद््भवण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा तातडीने उभारावा, अशी नागरिकांची आणि विविध संघटनांची मागणी असून त्यासाठी याआधी अनेक आंदोलनेही झाली आहेत. त्यामुळे नगरपालिका याबाबत किती वेगाने हालचाल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीरामपूरप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य काही गावांमध्ये असाच प्रश्न उद््भवण्याची शक्यता आहे. तेथे श्रीरामपूरकरांनी काढलेला तोडगा उपयोगी पडू शकेल. 
 
बातम्या आणखी आहेत...