आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाने मनपा दणाणली, बंद पडलेल्या दिव्यांच्या दुरूस्तीची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहराच्या विविध भागातील दिवे मागील चार-पाच महिन्यांपासून बंद आहेत. वेळोवेळी मागणी करूनही त्यांची दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे विरोधकांनी महापालिका कार्यालयात शनिवारी आंदोलन केले. संतापलेल्या आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनाच्या दरवाजाला बंद पडलेल्या दिव्यांचा हार घालत निषेध नाेंदवला. विद्युत विभागप्रमुख आर. जी. सातपुते यांच्या गळ्यातही बंद दिव्यांचा हार घालण्यात आला. हे सगळे झाल्यानंतर येत्या अाठ-दहा दिवसांत दिव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी दिले. 
 
महापालिकेची अार्थिक परिस्थती गंभीर झाली आहे. विद्युत साहित्य खरेदी करण्यासाठीदेखील मनपाकडे पैसे नाहीत. मागील साहित्याचे बिल मिळाल्याने ठेकेदार नवीन साहित्य देण्यास तयार नाही. साहित्य नसल्याने दिव्यांची दुरूस्ती गेल्या चार-पाच महिन्यांपासून रखडली आहे. अनेक नगरसेवकांनी महासभेत, तसेच प्रत्यक्ष भेटून संबंधित अधिकाऱ्यांकडे दिव्यांच्या दुरूस्तीची मागणी केली. परंतु प्रत्येक वेळी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच संतापलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी महापालिका कार्यालयात तीव्र आंदोलन केले. आयुक्तांच्या दालनाचा दरवाजा खुर्चीला बंद दिव्यांचा हार घालून विरोधकांनी निषेध नोंदवला. विद्युत विभागप्रमुख सातपुते यांनाही हार घालण्यात आला. 

अतिरिक्त आयुक्त वालगुडे यांनी आंदोलकांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु साहित्यच उपलब्ध नसल्याने दिव्यांची दुरूस्ती कशी होणार, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला. येत्या अाठ-दहा दिवसांत साहित्याचे मागील बिल देऊन नवीन साहित्याची खरेदी करावी, तसेच त्यानंतर तातडीने दिव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू होईल, असे लेखी अाश्वासन वालगुडे यांनी आंदोलकांना दिले. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमार वाकळे, अरिफ शेख, संजय घुले, विपुल शेटिया, विजय गव्हाळे, प्रा. माणिक विधाते, निखिल वारे, अभिजित खोसे, संभाजी पवार, प्रकाश भागानगरे उपस्थित होते. 

कार्यालय परिसरात फुटबॉल मॅच 
जुन्यामहापालिका कार्यालयाजवळील खेळाचे मैदान लग्न इतर समारंभांसाठी दिले जात असल्याने मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. वारंवार पाठपुरावा करूनही या मैदानावरील हे समारंभ बंद करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले न्यू सहकार क्रीडा मंडळाचे खेळाडू शालेय विद्यार्थ्यांनी शनिवारी नवीन महापालिका कार्यालयातील परिसरातच खेळाचा डाव मांडला. दिव्यांच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विरोधकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. 
बातम्या आणखी आहेत...