आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी खासगी कंपन्यांचे प्रचारमंत्री, अहमदनगरमधील सभेत कन्हैयाकुमारचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी, अदानींसारख्या खासगी कंपन्यांचे प्रसार-प्रचारमंत्री आहेत, असा आरोप नवी दिल्लीतील विद्यार्थी नेता कन्हैययाकुमार याने रविवारी केला. देशात बेकारी वाढत आहे, शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे. धार्मिक जातीय हिंसाचार, शेतकरी आत्महत्यांसारखे प्रश्न वाढत आहेत, असे सांगत महात्मा गांधीजींच्या हत्येत ज्यांचा सहभाग होता, त्यांच्याकडून गांधीवादाची काय अपेक्षा करायची, असा सवालही त्याने केला. 
 
ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या वतीने आयोजित लाँग मार्च रविवारी नगरमध्ये आला. यानिमित्त नगर-औरंगाबाद रस्त्यावरील सिटी लॉनमध्ये आयोजित सभेत कन्हैयाकुमार बाेलत होता. कन्याकुमारीपासून सुरू झालेला लाँग मार्च ‘सेव्ह इंडिया, चेंज इंडिया’ हे ब्रीदवाक्य घेऊन निघाला आहे. देश स्वतंत्र होऊनही आपल्या मूळ समस्या तशाच आहेत. जीएसटीसारखा एक कर असलेला कायदा अस्तित्वात येतो, पण देशात शिक्षणासाठी, दळणवळणासाठी एक यंत्रणा सरकारला आणता येत नाही, हे दुर्दैव आहे, असे कन्हैयाकुमार म्हणाला. 
 
निवडणुका या आंदोलनाचाच एक भाग असतात. आम्ही आंदोलक आहोत. निवडणुका लढू किंवा नाही, पण आमचे आंदोलन अखेरपर्यंत सुरूच राहील, असे सांगून तो म्हणाला, सध्याचे सरकार देशात एक प्रकारची संस्कृती थोपवण्याचा प्रयत्न करत आहे. या संस्कृतीला धार्मिकतेचा आधार घेऊन चुकीचा इतिहास जनतेवर थोपवायचा आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्याचे काम आम्ही करत राहू. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर झालेला हल्ला चुकीचा असल्याचेही त्याने नमूद केले. 
 
पुरोगामी विचारसरणीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्या. सरकारला त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. सरकारमध्ये अशा मारेकऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाठीशी घालणऱ्या प्रवृत्ती बसलेल्या आहेत. आपल्यावर दहशतवादी असल्याचा आरोप झाला, याचे वाईट वाटले नाही. आपली लढाई न्यायासाठी असल्याचे तो म्हणाला. 
बातम्या आणखी आहेत...