आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले घडवण्यासाठी आता केवळ शाळांवर विसंबून चालणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अभ्यासघर’ व्याख्यानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पालक. - Divya Marathi
‘अभ्यासघर’ व्याख्यानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पालक.
नगर- मुले घडवणे हे संपूर्ण समाजाचे काम आहे. केवळ शाळांवर विसंबून चालणार नाही. पालकांनी गटागटाने एकत्र आल्यास हे काम कमी वेळात, कमी कष्टात मोठ्या प्रमाणात करता येऊ शकेल, असे प्रतिपादन सातारा येथील विक्रम वाळिंबे यांनी केले. 
 
प्लस फाउंडेशन आयोजित ‘अभ्यासघर’ या विषयावर वाळिंबे बोलत होते. मनापासून जे आवडते, ते समजून घेण्याचा ध्यास आपल्याला लागतो. हा ध्यास पूर्ण करण्यासाठी वाचन, चिंतन, मनन आपण करतो, अनुभवांची देवाण-घेवाण करतो. यातून अधिकाधिक जिज्ञासा जागृत होते, हे खरे शिक्षण. या शिक्षणात शाळेतील शिक्षक, क्लासचे शिक्षक किंवा कोणीतरी येऊन शिकवतंय किंवा अभ्यास कर म्हणून लकडा लावणारेही कोणी नसते, असे सांगून वाळिंबे म्हणाले, कुतुहूल ही माणसाची नैसर्गिक वृत्ती आहे. चौथीपर्यंतचा अभ्यास मुलांना आवडतो. कारण त्या अभ्यासाचा अनुभव ते आजूबाजूला घेत असतात. पण तिथून पुढचे शिकणे कंटाळवाणे होते. कारण तेव्हा ज्ञानाच्या कक्षा विस्तारतात. गणितातली अवघड समीकरणे, धातू-अधातूमधील केमिकल रिएक्शन अशा गोष्टी अनुभवायला मिळालेल्या नसतात. त्याचा अनुभवलेल्या गोष्टींशी तुलनात्मक अभ्यास केला, तरच तो अभ्यास निरस होता उत्साहवर्धक होतो. 
 
इतर देशांमध्ये शिक्षण क्षेत्रातली स्थित्यंतरे ३००-४०० वर्षांपासून चालू आहेत. आपल्याकडे ती १००-१५० वर्षांपासून म्हणजेच अगदी अलीकडची आहे. शिक्षणपध्दती, परीक्षापध्दती सदोष आहे. यावर काही उपाय आहे का, यासाठी शिक्षणाकडे पाहण्याची आपली दृष्टी विशाल करावी लागेल. आपली मुले घडवणे हे आपल्या संपूर्ण समाजाचे काम आहे. केवळ शाळांवर विसंबून चालणार नाही. पालकांनी गटागटाने एकत्र आल्यास हे काम कमी काळात, कमी कष्टात मोठ्या प्रमाणात करता येऊ शकेल, असे वाळिंबे म्हणाले. 
 
टीव्ही, मोबाइलकडे मुले सध्या खूप आकर्षित होत आहेत. या मुलांविषयी अधिक माहिती घेतल्यावर जाणवते की, यांना व्यापक जीवनाचे दुर्भिक्ष्य असते. बऱ्याचदा शाळा, घर, अभ्यास क्लास एवढ्याच बंदिस्त दिनचर्येत यांचा दिवस बांधलेला असतो. तोचतोपणामुळे जगणे कंटाळवाणे होते. यापेक्षा काहीतरी वेगळे मिळते म्हणून मुले त्याकडे ओढली जातात. अशा वेळी पालकांनी मुलांना कृतिशील बनवले पाहिजे. छंद, खेळ, अवांतर वाचन, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडे जाणे, संगीत, नाट्य अशा अनुभव समृद्ध करणाऱ्या खिडक्यांची दालनं उघडली की, त्या छोट्या खिडकीत वारंवार डोकावण्याची मुलांना इच्छा होत नाही. पालक स्वत: इंटरनेटवरच्या चांगल्या भांडाराची किती शोधाशोध करतात. पालक इंटरनेटचा ज्ञानभांडार म्हणून कसा वापर करतात हे दिसले, तर मुलं चुकीची वागत नाहीत. 
 
स्वयं अध्ययन म्हणजे काय ? 
स्वयं अध्ययन म्हणजे काय, हे सांगताना वाळिंबे म्हणाले, पाठ्यपुस्तक गृहपाठ, पाठांतर म्हणजे अभ्यास नव्हे. मुले जे करायचे स्वत:हून ठरवतात तो म्हणजे अभ्यास. अभ्यास चांगला अभ्यास यातला फरक समजायला हवा. आई-वडिलांनी बळजबरी करुन अभ्यास होत नाही. ते अभ्यासाचे नाटक होते. मुलांनी व्यावहारिक धडपड केली की, त्यांना ‘स्व‘ची ओळख होते. स्वत:ला काय येते, काय आवडते ते मुलांना आधी समजू द्या. जो वेळेचे नियोजन करु शकतो, तोच स्वयं अध्ययन करु शकतो. केवळ पुस्तकी ज्ञान नको. कृतींवर भर द्या. 
बातम्या आणखी आहेत...