आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर महिन्यात गमवावा लागतो चौघांना जीव, नगरमध्ये स्वाइन फ्लूचा उद्रेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारामुळे दरमहा सरासरी तीन-चार जणांना जीव गमवावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य नागरिक धास्तावले आहेत. मागील सात महिन्यांत जिल्ह्यातील २९ जणांना या आजारामुळे प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या जात असल्या, तरी व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. 
 
स्वाइन फ्लू हा इन्फ्लुएन्झा रोगाचा एक प्रकार असून हा आजार सामान्यतः डुकरांमध्ये आढळून येणाऱ्या विषाणूंमुळे होतो. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असून तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाऊ शकतो. अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील डुकरांपासून या आजाराचा संसर्ग वाढत गेला. या विषाणूंचा प्रसार रोग्याच्या नाकातील घशातील स्राव, त्याचा घाम किंवा थुंकीमधून होतो. ताप, खोकला, घसा दुखणे, अतिसार, उलट्या, तसेच श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. 
 
नगर जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान ५९ हजार तापाचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी ५८ हजार ५५० रुग्णांमध्ये अशी लक्षणे आढळून आली होती. परंतु बहुतेक रुग्ण उपचारानंतर बरे झाले. त्यापैकी ४०० रुग्ण स्वाइन फ्लूचे संशयित असल्याने त्यांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या. त्यापैकी ६४ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. 
 
संगमनेर तालुक्यात सोमवारी (७ ऑगस्ट) एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने धास्ती वाढली आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत स्वाइन फ्लूमुळे जिल्ह्यात २९ जणांचा मृत्यू झाला. दरमहा सरासरी तीन-चार जणांचा जीव या संसर्गजन्य आजारामुळे जात आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूंमध्ये पन्नास वर्षांवरील रुग्णांची संख्या नऊ, तर चाळीस ते पन्नास वर्षांपर्यंतच्या रुग्णांची संख्या सहा आहे. अल्पवयीन मुलांची संख्या सहा झाली आहे. एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये १५ स्त्रियांचा समावेश आहे. 
 
यावर उपाय म्हणून जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा मुबलक प्रमाणात टॅमी फ्लू गोळ्या देत असल्याचा दावा करत आहे. प्रत्यक्षात प्रभावी जनजागृतीसाठी विशेष उपाययोजना होताना दिसत नाही. उपाययोजना प्रभावी असती, तर रुग्णांची संख्या घटली असती, असा युक्तिवाद केला जात आहे. 
 
एकाच महिन्यात मृत्यू 
जिल्ह्यात मागील महिन्यात (जुलै) सात रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. हे रुग्ण नगर जिल्ह्यातील असून पुणे, नाशिक, मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाले आहेत. यापूर्वी एप्रिलमध्येही सात रुग्णांचा मृत्यू झाला होता. 
 
राहाता, संगमनेरमध्ये रुग्णांचे वाढते प्रमाण 
जिल्ह्यात राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासे या तालुक्यांत रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. जानेवारी ते आजतागायत संगमनेरमध्ये सात, श्रीरामपूर चार, नेवासे चार राहाता तालुक्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. 
 
उपचारानंतर रुग्ण बरा होतो
वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीतही सूचना दिल्या जातील. जेथे रुग्ण आढळले तेथील डॉक्टरच्या कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. रुग्णांनी घाबरू नये. उपचारानंतर रुग्ण बरा होतो.
'' डॉ.संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी. 
 
प्रतिबंधात्मक उपाय 
हात स्वच्छ धुवावेत, गर्दीत जाणे टाळणे, स्वाइन फ्लू रुग्णापासून दूर रहा, खोकताना- शिंकताना तोंडाला रुमाल लावावा, भरपूर पाणी प्या पुरेशी झोप घ्या, पौष्टिक आहार घ्या, हस्तांदोलन, अालिंगन टाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, मास्क लावावा. 
बातम्या आणखी आहेत...