आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसहभाग मिळत नसल्याने स्वाइन फ्लू नियंत्रणात अपयश, मृत्यूचा आलेख चढताच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्वाइनफ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मृत्यूचा आलेखही चढता आहे. आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असल्या, तरी त्यासाठी लोकसहभाग मिळालेला नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी एका व्यक्तीकडून दुसऱ्याला या आजाराचा प्रसार सुरूच आहे. संशयित रुग्णांना टॅमी फ्लू देऊन उपचार केले जातात, पण हा आजार थांबवण्यात आरोग्य यंत्रणांना अपयश आले आहे. 
 
स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य अाजार असून तो एकाकडून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. या आजाराच्या विषाणुंचा प्रसार रूग्णांच्या नाकातील घशातील स्राव, त्याचा घाम थुंकी यामधून होतो. ताप, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत. टॅमी फ्ल्यू हे औषध एच-१ एन-१ च्या विषाणुंच्या संसर्गावर प्रभावी मानले जाते. या औषधाचा पुरेसा साठा असला, तरी स्वाइन फ्लूचे संकट जीवघेणे आहे. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरा होतो, पण बऱ्याचदा रुग्ण वैद्यकीय उपचार घेण्यास विलंब करत असल्याने त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते. मास्क आणि सर्जिकल मास्क वगैरे वैयक्तिक संरक्षक साधनांचा पुरेसा साठा सरकारकडे अाहे. सन २०१४ मध्ये हा आजार महाराष्ट्रात पोहोचला. आता तो थेट गल्ली अन् दारापर्यंत येऊन पोहोचला. 
 
स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तथापि, नागरिक या आजाराकडे दुर्लक्ष करून प्रतिबंधात्मक उपायांना फाटा देतात. त्यामुळे २०१४ नंतर या आजाराची व्याप्ती नगर जिल्ह्यात वाढली आहे. नगरची आकडेवारी पाहून राज्यस्तरीय आरोग्य यंत्रणांचीही झोप उडाली आहे. जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सरासरी दरमहा चार-पाच जणांचा मृत्यू या आजारामुळे होत आहे. ज्या भागात रुग्ण आढळून आले, त्या भागात आरोग्य विभागाने पथक पाठवून संपर्कात आलेल्या व्यक्तींवर उपाय सुरू केले. त्या परिसरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आजार नियंत्रणाबाबत चर्चा केली आहे. 
 
मास्कचा पडला विसर 
अडीच वर्षांपूर्वी स्वाइन फ्लू आजाराची जिल्ह्यातील नागरिकांना प्रथमच ओळख झाली होती. त्यावेळी नगर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी धास्तीपोटी तोंडाला मास्क, तसेच रुमाल लावणे सुरू केले होते. त्यानंतर या आजाराची भीती कमी होऊन नागरिकांनी काळजी घेण्याचे बंद केले. त्यामुळे या आजाराचा प्रसार होण्यास मदत झाली आहे. 
 
८० रुग्णांचे निदान 
- स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. गर्दीत जाताना तोंडाला रुमाल बांधणे आवश्यक आहे. जिल्ह्यात जानेवारीपासून सुमारे ८० रुग्णांचे निदान झाले होते. रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी आम्ही तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. हा आजार उपचारानंतर बरा होतो, नागरिकांनी घाबरू नये.
'' डॉ.संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी. 
 
उपाय हाच उपचार 
हातसाबणाने धुवावेत, गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे, रुग्णाच्या संपर्कात जाऊ नये, खोकताना- शिंकताना तोंडाला रुमाल लावावा, भरपूर पाणी प्यावे पुरेशी झोप घ्यावी, पौष्टिक आहार घ्यावा, हस्तांदोलन किंवा अलिंगन देण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे, तोंडावर मास्क लावावा. हे उपाय केले, तर स्वाइन फ्लूपासून बचाव होऊ शकतो. 
बातम्या आणखी आहेत...